पुणे : ‘व्याकरण हा मुलांना रूक्ष, कंटाळवाणा आणि दुर्लक्षित करण्याचा विषय वाटतो. पण, त्याला भाषाविज्ञानाची जाेड दिली, तर व्याकरण समजण्यास सोपे जाते,’ अशी भावना ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांनी शनिवारी व्यक्त केली.वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या यास्मिन शेख यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. शेख यांनी, आपल्याला घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना स्मृतिरंजनाची शब्दमैफल रंगविली. ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे, शेख यांची कन्या रुमा बावीकर, दिलीप फलटणकर या वेळी उपस्थित होते.
‘संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. व्याकरणाचे मान्य नियम सोप्या भाषेत समजावून सांगणाऱ्या साहित्याची निर्मिती करावी, अशी सूचना त्या वेळी राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्ष डाॅ. सरोजिनी वैद्य यांनी मला केली. त्यातून ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे पुस्तक आकाराला आले आणि ते लोकप्रिय झाले,’ अशी आठवण यास्मिन शेख यांनी सांगितली.
‘आईच्या आकस्मिक निधनानंतर वडिलांनी सात अपत्यांचे पालनपोषण केले. मी आणि मोठी बहीण एकाच वर्गात असल्याने एकाच वर्षी मॅट्रिक झालो. पुढील शिक्षण घेण्यासाठी हट्ट करावा लागला. स. प. महाविद्यालयात बी. ए. करत असताना श्री. म. माटे हे व्याकरण आणि के. ना. वाटवे हे भाषाशास्त्र शिकवायचे. माटे यांनी मला लेक मानले होते. ‘मला मुलगा असता, तर तुला सून करून घेतले असते,’ असेच ते सर्वांना सांगत. त्यांच्या घरी जेवायला गेल्यानंतर माटे यांच्या पत्नी मला आवर्जून कुंकू लावायच्या. बी.ए.ला प्रथम आल्याबद्दल प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांनी मला पाठ्यवृत्ती दिली होती. मात्र, त्यासाठी एम.ए. करणे भाग होते. पण, वडिलांच्या आग्रहामुळे मला रुंगठा हायस्कूलमध्ये नोकरी करावी लागली. दांडेकर यांचे दुसरे पत्र आल्यानंतर वडिलांनी एम.ए. करण्याची परवानगी दिली,’ असा स्मृतींचा पट शेख यांनी उलगडला.
‘मी जन्माने ज्यू आहे. ज्यू आणि मुसलमान हे पक्के वैरी समजले जातात. त्यामुळे मी मुसलमानाशी लग्न करायचे ठरवले, तेव्हा वडिलांनी विरोध केला. त्या वेळी एक महिना पतीच्या घरी राहिल्यानंतर मग सासरकडच्या व्यक्तींच्या मदतीने विवाह केला. विवाहानंतर घरी गेल्यावर वडिलांना मिठी मारली, तेव्हा त्यांनी मला आनंदाने जवळ घेतले होते. माझे वडील, माटे, श्री. पु. भागवत यांच्यामुळे यास्मिन शेख घडली,’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.जोशी आणि काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.