पुणे : हरित ऊर्जेच्या क्षेत्रात सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, राज्यात आगामी पाच वर्षांत सात लाखांहून अधिक नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होणार असून, महिला आणि बेरोजगार युवकांना ‘सौर कोशल्य प्रशिक्षण’ देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सौर कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत महावितरण, आशियाई विकास बँक आणि मिटकॉन यांच्या सहकार्यातून नाशिकच्या एकलहरे येथील मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रामध्ये सौर कौशल्य प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक सचिन तालेवार, राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे या वेळी उपस्थितीत होते.
चंद्र म्हणाले, ‘राज्यात विजेची स्थापित क्षमता सध्या ३६ हजार मेगावॅट आहे. त्यात २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार असून, त्यात सौर ऊर्जेचा सर्वाधिक वाटा असेल.’
‘राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा म्हणून जगातील सर्वांत मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’च्या माध्यमातून उभारण्यात येतो आहे. तसेच, ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना,’ ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ अशा योजनांमुळे सौर ऊर्जा वापराकडे नागरिकांचाही कल वाढतो आहे,’ असे चंद्र यांनी सांगितले.