शहरात अन्नधान्याचा तुटवडा नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजारात करोनाचा संसर्ग आढळल्यानंतर भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून (१९ मे) पुकारलेल्या बंदबाबत विचारविनिमय करण्यासाठी आयोजित बैठकीत बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बंदबाबत विचार करण्यासाठी येत्या शनिवारी (२३ मे) व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

बंदच्या भूमिकेबाबत व्यापाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. पदाधिकारी विजय मुथा, जवाहरलाल बोथरा, प्रवीण चोरबेले, नितीन नहार,  अशोक लोढा, रायकुमार नहार यांच्यासह बाजारातील व्यापारी वर्ग बैठकीस उपस्थित होते.

ओस्तवाल म्हणाले, भुसार बाजारात करोनाचा  संसर्ग आढळून आला आहे. व्यापारी, त्यांचे कुटुंबीय तसेच कामगार वर्ग भयभीत आहेत. पणन संचालक आणि बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे. व्यापारी बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक असले, तरी बाजार आवाराचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आहे. व्यापार सुरू करण्याबाबत पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. बाजार समितीकडून भुसार बाजारात उपाययोजना करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी काही काळ व्यापार बंद ठेवावे लागणार आहेत. शनिवारी पुन्हा व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

अन्नधान्याचा तुटवडा नाही

शहरातील मुख्य भुसार बाजार बंद असला, तरी किरकोळ किराणा माल विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत. व्यापाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे. गेले पावणेदोन महिने व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवहार सुरळीत ठेवले. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. बाजार समितीकडून पुढील चार दिवसांत उपाययोजना केल्या जातील. त्यानंतर येत्या शनिवारी व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक होईल. या बैठकीत बंदबाबत व्यापारी भूमिका मांडतील, असे दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.

बाजार सुरू व्हायची खात्री

भुसार बाजारातील व्यापाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. बाजारआवारातील निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. घाऊक बाजारात खरेदीसाठी गर्दी न होऊ देणे तसेच अन्य उपाययोजनांबाबत चर्चा झाली आहे. जेव्हा राज्यातील अन्य बाजार बंद होते. तेव्हा पुण्यातील  भुसार बाजारातील  व्यापाऱ्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात अन्नधान्याचा पुरवठा केला. त्यामुळे तुटवडा जाणवला नाही. उपायोजना केल्यानंतर व्यापारी पुन्हा व्यापार सुरू करतील, अशी खात्री आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grocery wholesalers in market yard will close after covid 19 case found zws
First published on: 20-05-2020 at 02:17 IST