पुणे : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात यंदाच्या हंगामात शेंगदाण्याच्या लागवड क्षेत्रात घट झाली असून शेंगदाण्याच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचे दर प्रतवारीनुसार ११० ते १४० रुपये दरम्यान आहेत.

शेंगदाण्याची आवक वाढणार नसल्याने दर टिकून राहणार आहेत. मार्केट यार्डातील भुसार बाजारात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशातून शेंगदाण्याची आवक होत आहे. भुसार बाजारात दररोज साधारपणे १०० ते १५० गाड्यांची आवक होत आहे. राजस्थान, गुजरातमधील शेंगदाणा संकरित (हायब्रीड) आहे. किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचे दर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. शेंगदाणा दरातील तेजी दीर्घकाळ टिकून राहणार आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील शेंगदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.

दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यात शेंगदाण्याची लागवड केली जाते. दक्षिणेकडील राज्यातील शेंगदाण्याची लागवड येत्या काही दिवसात सुरू होईल. मात्र, दक्षिणेकडील शेंगदाणा या भागातील राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो. दक्षिणेकडील राज्याची शेंगदाण्याची प्रत चांगली आहे. मात्र, दक्षिणेकडील राज्यांतील शेंगदाण्याची आवक महाराष्ट्रात कमी होते. तेथील शेतकरी दक्षिणेकडील राज्यात शेंगदाणा विक्रीस प्राधान्य देतात. दक्षिणेकडील राज्यांतील शेंगदाण्याची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

शेंगदाण्याला वर्षभर मागणी

किरकोळ बाजारात शेंगदाण्याला वर्षभर मागणी असते. गुजरातमधील जाडा शेंगदाण्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. महाराष्ट्रात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील शेंगदाणा मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविला जाताे. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत शेंगदाण्याला मागणी वाढते. दिवाळीनंतर शेंगदाण्याच्या मागणीत घट होते. शेंगदाण्याला तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मागणी असून शेंगदाणा तेलाचा वापर वाढलेला आहे, असे शेंगदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात एक किलो शेंगदाण्याचे दर

जाडा शेंगदाणा – १२० ते १२५ रुपये

जी टेन शेंगदाणा – ११५ ते १२० रुपये
घुंगरु शेंगदाणा – ११० ते १३० रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पॅनिश – १३० ते १४० रुपये