पुणे : भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात मोलाची भूमिका बजावणारे आणि १९७१च्या युद्धानंतर पाकिस्तानात युद्धकैदी म्हणून पकडले गेल्यानंतर तिथून तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी बेत आखून तो तडीस नेण्याचा प्रयत्न करणारे ग्रुप कॅप्टन (नि.) दिलीप कमलाकर परुळकर (८२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. १९७१ च्या युद्धावेळी रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या युद्धकैद्यांच्या छावणीतून दोन सहकाऱ्यांसह त्यांनी केलेल्या यशस्वी पलायनाची घटना खूप गाजली होती.

परुळकर मार्च १९६३ मध्ये भारताच्या हवाई दलात रुजू झाले. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केले. डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर होते. तसेच, दोन वर्षे सिंगापूर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) बटालियन कमांडर म्हणूनही योगदान दिले. १९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्धावेळी शत्रूच्या गोळीबाराने त्यांच्या विमानाला इजा झाली, तसेच त्यांच्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले होते. मात्र, त्यानंतरही विमान उडवून ते यशस्वीरीत्या तळावर परतले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना वायुसेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

भारताच्या हवाई दलाने परुळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘१९७१ च्या युद्धावेळी विंग कमांडर डी. के. परुळकर यांनी प्रचंड शौर्य दाखवले. पाकिस्तानात युद्धकैदी असताना त्यांनी दोन सहकाऱ्यांसह सैन्याच्या छावणीतून पलायन केले. त्यांनी दाखवलेला निर्धार, शौर्य हे हवाई दलाच्या सर्वोत्तम परंपरेतील होते. त्यांच्या त्या कृतीमुळे शत्रूला हवाई दलाचे सामर्थ्य केवळ आकाशातच नाही, तर जमिनीवरही असल्याचे मान्य करून कौतुक करावे लागले होते,’ असे हवाई दलाने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी बेत

पाकिस्तानात युद्धकैदी असताना तेव्हा फ्लाइट लेफ्टनंट रँक असलेल्या परुळकर यांनी पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून भारतात पळून येण्याचा धाडसी बेत आखला. त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचे बारीक नियोजन केले. फ्ला. ले. ग्रेवाल आणि फ्ला. ले. हरिश सिंहजी या इतर दोन सहकाऱ्यांसह ते तुरुंगातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. कुठलाही संशय येऊ नये, म्हणून त्यांनी ताबारेषेकडे (एलओसी) येण्याऐवजी ते अफगाणिस्तानच्या सीमेकडे जाण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून सुटल्यावर पेशावर, लंडी कॅनालपर्यंत ते गेले. अफगाणिस्तानच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असतानाच तेथील गावकऱ्यांना त्यांच्या हालचाली पाहून संशय आला आणि त्यांना पुन्हा ताब्यात घेतले गेले. नंतर १९७२ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून पळून जाण्याची कथा साऱ्या जगभर गाजली. त्यांच्या या धाडसाची अंगावर रोमांच उभे करणारी कथा फेथ जॉन्स्टन यांनी ‘फोर माइल्स टू फ्रीडम’ या पुस्तकात लिहिली आहे.‘द ग्रेट इंडियन एस्केप – खुले आसमान की ओर’ नावाचा चित्रपटही त्यावर निघाला आहे.