पुणे : गुटख्यावर बंदी घातलेली असताना शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याचे वितरण, तसेच विक्री प्रकरणात काळेपडळ पाेलीस, तसेच अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई करुन ६४ लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चार मालवाहू वाहने (पीकअप) पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. .

संपतराज पेमाराम चौहान (वय ३८, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चव्हाण याच्यासह त्याच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार उणवने यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, इतर पदार्थाच्या विक्री, तसेच बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहर परिसरात बेकायदा गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. गुटख्याचे वितरण छुप्या पद्धतीने शहरात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, तसेच एफडीएच्या पथकाने वेळोवेळी कारवाई केली. कोंढव्याजवळील उंड्रीत गुटख्याचा साठा करण्यात आल्याची माहिती एफडीएच्या पथकाला मिळाली. त्यानंतर काळेपडळ पोलीस आणि एफडीएच्या पथकाने एका गोदामावर छापा टाकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईसाठी पोलीस आणि एफडीएचे पथक आल्याची चाहूल लागल्याने गोदामात असलेले तीन ते चार जण पसार झाले. पोलिसांनी गोदामाच्या परिसरातून आरोपी चौहानला ताब्यात घेतले. गोदामाच्या बाहेर गुटख्याची वाहतूक करण्यासाठी चार गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी गोदामातून ६४ लाख ४४ हजारांचा गुटखा आणि १२ लाख रुपयांची चार वाहने असा ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील आणि एफडीएच्या पथकाने ही कारवाई केली.