पुणे : करोनामुळे दोन वर्षात आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांची वर्गात जाऊन शिकण्याची, हाताने अक्षरे वळवण्याची सवय मोडली. असे असले तरी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच मन स्थिर करण्यासाठी वहीच्या शेवटच्या पानावर दिवसभरात कधीही अवांतर चार ओळी लिहिण्याची सवय लावून घ्यावी. दररोजच्या अवांतर लिहिण्याने मन स्थिर होऊन धांधरटपणा कमी होतो, असा कानमंत्र ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्वानंद ॲडव्हेंचर्स, संवाद पुणे आणि रंगभूमी सेवा संघटनेच्यावतीने पडद्यामागील कलाकारांच्या ५० मुला-मुलींना आळेकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप आज करण्यात आले. त्यावेळी आळेकर बोलत होते. विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील, बालसाहित्यकार राजीव तांबे, स्वानंद ऍडव्हेंचर्सचे अध्यक्ष संजीव शहा, साधना शहा महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, रंगभूमी सेवा संघटनेचे राहुल भोसले या वेळी उपस्थित होते.