पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची रचना करताना खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पुरंदरसह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील काही भागांचा समावेश करून भारतीय जनता पक्षाने विरोधकांसह मित्रपक्षांचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागांची व्याप्ती वाढविताना भाजपला अनुकूल प्रभागही जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीयांचा कस लागणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या महापालिका निवडणुकीवेळी २४ नगरसेवक निवडून आले होते. यंदा ही नगरसेवकांची ही संख्या ३७ एवढी होणार आहे. या मतदारसंघातील प्रभागांची रचना करताना लगतच्या विधानसभा मतदारसंघाचा भाग येथील प्रभागांना जोडण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवारांच्या सोईनुसार त्यांच्या हक्कांचे प्रभाग केले आहेत. ते करताना मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्या पुढील अडचणीतही वाढ केली आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा प्रभाग काहीसा सोईस्कर करण्यात आला आहे, ही बाब वगळता अन्य प्रभागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांपुढेही आव्हान असणार आहे.
शेवाळवाडी, मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर या भागाला वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील खराडीचा भाग जोडण्यात आला आहे. मगरपट्टा, माळवाडी, बी. टी. कवडे रस्ता या भागाची भौगोलिक सलगताही तोडण्यात आली आहे. हा भाग वैदूवाडी भागाशी संलग्न करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पुढेही आव्हान निर्माण झाले आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही काही प्रमाणात ताकद आहे. त्यामुळे ती कमी करण्याचा प्रयत्नही भाजपकडून करण्यात आला आहे. मनसेची ताकद असलेल्या प्रभागांची मोडतोड करून हा भाग कोंढव्यापर्यंत जोडण्यात आला आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेच्या प्रभागही अडचणीचा करण्यात आला आहे. कात्रज, कोंढवा या भागापर्यंत या मतदारसंघाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. ते करताना हडपसरसह पर्वती, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, पुरंदर-हवेली आणि वडगावशेरी भाग या मतदारसंघातील प्रभागांना जोडून विरोधकांपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. अनेक मतदारसंघाचे भाग जोडण्यात आल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागात दहा ते पंधरा किंवा पंधरा ते वीस सर्वपक्षीय दिग्गज नगरसेवक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हे सर्व नगरसेवक भाजप वगळता अन्य पक्षांचे असतील, याची खरबदारी प्रभाग रचना करताना घेण्यात आली आहे.
कोरेगाव पार्क-मुंढवा प्रभागाला गणेशनगर, डेमको सासयटी, घोरपडी पासपोर्ट ऑफिस, कवडेवाडी, मौालाना अबुल कलाम आझाद स्मारक, कलाशंकर नगर, भीमनगर वसाहत, घोरपडी रेल्वे वसाहत, ओशो आश्रम, मुंढवा गावठाण, मगरपट्टा सिटी भाग जोडण्यात आला आहे.
मित्रपक्षांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मनसेच्या अनेक माजी नगरसेवकांच्या प्रभागाची व्याप्ती वाढविताना अनेक ठिकाणी भौगोलिक सलगता तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सर्पक्षीयांसाठी आव्हानात्मक असणार आहे.
दृष्टिक्षेप
प्रभाग प्रभागाचे नाव
१४ – कोरेगाव पार्क-मुंढवा
१५ – मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळी
१६ – हडपसर-सातववाडी
१७ – रामटेकडी-माळवाडी
१८ – वानवडी- साळुंखे विहार
१९ – कोंढवा खुर्द-कौसरबाग