पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी मराठीच्या प्राध्यापकाकडे देण्यात आल्याचे समोर आले आहे. विद्यापीठात शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचा फटका वेगवेगळ्या स्तरांवर बसत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा >>> पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार इंग्रजी विभागप्रमुख या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. डॉ. देसाई यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ. देसाई मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी विभागातील प्राध्यापकाकडे इंग्रजी विभागप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील इंग्रजी विभागात एकूण मंजूर पदे आठ आहेत. सद्य:स्थितीत दोनच प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यातील प्रा. इंद्राणी चॅटर्जी यांनी तीन वर्षांहून अधिक काळ विभागप्रमुख पदाची जबाबदारी निभावल्यानंतर त्यांनी पदमुक्त करण्याची विनंती कुलगुरूंकडे केली. अन्य कार्यरत प्राध्यापक सहायक प्राध्यापकपदावर असल्याने आणि त्यांची पीएच.डी. अद्याप पूर्ण नसल्याने विभागप्रमुख पदाची जबाबदारी देण्यासाठी प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. विभागप्रमुख या पदाची जबाबदारी प्राध्यापकाकडे दिली जात असल्याने मराठी विभागातील डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “बिल्डर कुटुंबाने पैशांच्या जोरावर गुन्हा पचवला होता, पण…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठात प्राध्यापक भरती झालेली नाही. विद्यापीठातील अनेक प्राध्यापक निवृत्त झाल्याने प्राध्यापकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाला विद्यापीठ निधीतून कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्त करावे लागत आहेत. गेल्या वर्षी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांतील शासनमान्य पदांवरील प्राध्यापक भरतीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या तीन स्तरांतील १११ पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले होते. मात्र, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण या पदभरतीमध्ये लागू करण्यासाठी ही भरती प्रक्रिया रखडली आहे. विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी आहे. त्यामुळे इंग्रजी विभागात प्राध्यापक उपलब्ध नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून मराठी विभागातील डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्राध्यापक भरतीमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आरक्षणाचा समावेश करून सुधारित बिंदूनामावली शासनाला सादर करण्यात आली आहे. त्यानुसार प्राध्यापकभरती पूर्ण झाल्यावर विद्यापीठात प्राध्यापक उपलब्ध होतील. त्यानंतर या पदाची जबाबदारी अन्य पात्र प्राध्यापकाकडे सोपवण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले.