पुणे : सावर्जनिक आरोग्य विभागाने राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राबविलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष आरोग्य अभियानांतर्गत २ लाख ३० हजार ६५३ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यात १ कोटी ८ लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३२ लाख ७१ हजार पुरुष आणि ७५ लाख ८७ हजार महिला आहेत.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्य तपासणीसह विविध जनजागृती उपक्रम आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन जिल्हा आणि महापालिका स्तरावर करण्यात आले. राज्यभरातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि महापालिका स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरांमध्ये महिलांचे असंसर्गजन्य आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग व रक्तदाब तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, बालकांचे लसीकरण, पोषण व मासिक पाळी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबिरे, निक्षय मित्र नोंदणी मोहीम, आयुष्मान कार्ड वितरण, पंतप्रधान मातृ वंदना कार्ड वितरण आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
या अभियानात असंसर्गजन्य आजारांवरील तपासण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. त्यात १४ लाख ४१ हजार ६४८ नागरिकांची रक्तदाबासाठी तर १४ लाख ९८ हजार २१९ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली. कर्करोग तपासणीअंतर्गत मुख कर्करोगाच्या ६ लाख १८ हजार ३९३, स्तनाच्या कर्करोगाच्या ३ लाख २० हजार १६४ आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या २ लाख ४१ हजार १४८ तपासण्या करण्यात आल्या. या अभियानांतर्गत तपासणी व निदानातून आढळलेल्या आजारांचा पाठपुरावा प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य संस्था करणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना व विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या अभियानामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १० हजार ७६६ उपकेंद्रे, १ हजार ९३१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७९७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ हजार ४० शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, ३७२ ग्रामीण रुग्णालये, १०२ उपजिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, २२ स्त्री रुग्णालये, २ संदर्भ सेवा रुग्णालये व १९ जिल्हा रुग्णालये तसेच विभागातील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला.
रक्तदानासह अवयवदानावर भर
या अभियानात राज्यभरात रक्तदानासाठी १ हजार ९६९ शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यात ५१ हजार ३३९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच ४ हजार ७६५ नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली. आरोग्य जनजागृतीतील हे एक मोठे पाऊल ठरले असून महाराष्ट्र हे याबाबतीत प्रथम स्थानी आहे.,