पुणे : करोना महासाथीमुळे दोन वर्षे खंड पडल्यानंतर आता पुन्हा एकदा आरोग्य चित्रपट महोत्सव रसिकांच्या भेटीला येत आहे. पी. एम. शाह फाउंडेशनतर्फे शुक्रवार आणि शनिवारी (८,९ एप्रिल) १० व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य विषयावरील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय लघुपट आणि माहितीपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील सभागृहात हा महोत्सव होणार असून प्रेक्षकांसाठी तो विनामुल्य खुला आहे. २००९ पासून पी. ए. शाह फाउंडेशन या महोत्सवाचे आयोजन करत आहे. यंदा महोत्सवाचे दहावे वर्ष असून आरोग्य विषयक तब्बल ४९ लघुपट आणि माहितीपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते होणार आहे. समारोप कार्यक्रम आणि बक्षिस वितरणासाठी दिग्दर्शक सुनील सुकथकनकर उपस्थित राहणार आहेत. जगातील अनेक देशांनी पाठवलेल्या १००हून अधिक चित्रपटांपैकी ४९ चित्रपट (लघुपट, माहितीपट) महोत्सवासाठी निवडण्यात आले आहेत. मानसिक आरोग्य, बाललैंगिक शोषण, करोना, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, अवयवदान, कर्करोग, आरोग्य आणि पर्यावरण अशा वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांचा या महोत्सवात समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपट प्रदर्शन कधी

शुक्रवारी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ तर शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.