पचनसंस्थेचे विकार, कोलेस्ट्रोलवर नियंत्रण, रक्त शुद्धीकरण, हृदयविकार यांसाठी फायदेशीर
वेगवेगळ्या हंगामामध्ये येणाऱ्या नेहमीच्या फळांचा सर्वानाच परिचय असतो. अनेकदा काही वेगळीच फळे बाजारात दाखल होतात आणि त्याबाबत सर्वानाच कुतूहल निर्माण होते. अशी फळे वेगवेगळ्या भागात नानाविध नावाने ओळखली जातात. असेच एक आरोग्यासाठी हीतकारक असलेले गळलिंबू नावाचे फळ पुण्याच्या फळबाजारात दाखल झाले आहे. चवीला आंबट असलेल्या या फळाच्या एका नगाला किंमत चक्क शंभर रुपये आहे.
बीड जिल्ह्य़ातील शिवणी गावातून गळलिंबांची आवक रविवारी (२२ ऑक्टोबर) श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात झाली. या फळाचा रंग पांढरट आणि हिरवट असून ते सोलून खाल्ले जाते. आयुर्वेदात गळलिंबाचे सेवन करणे हितकारक मानले जाते. पचनसंस्थेचे विकार, कोलेस्ट्रोलवर नियंत्रण, रक्त शुद्धीकरण, हृदयविकार तसेच काही असाध्य विकारांसाठी गळलिंबाचे सेवन केल्यास निश्चित फायदा होतो. आयुर्वेदात गळलिंबाचे सेवन करणे हितकारक असल्याचे विशद करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यांकडून गळलिंबाला चांगली मागणी आहे, अशी माहिती फळबाजारातील विक्रेते सौरभ कुंजीर यांनी दिली. सध्या या फळाची आवक पुणे, मुंबईतील फळबाजारात सुरू झाली आहे. बीडमधील शिवणी गावातील शेतकरी सखाराम शिंदे यांनी गळलिंबाचे उत्पादन घेतले आहे, असे कुंजीर यांनी सांगितले.
गळलिंबू उत्पादक शेतकरी सखाराम शिंदे यांनी सांगितले, काही वर्षांपूर्वी गळलिंबाचा वापर पचनसंस्थेच्या विकारांवर केला जायचा. गळलिंबाचे उत्पादन शेतक ऱ्यांकडून घेतले जात नाही. मी शिवणी गावात एक एकरावर दोनशे गळलिंबांच्या झाडांची लागवड केली. तीन वर्षांनतर झाडांना फळधारणा होते. सहा महिन्यांपासून गळलिंबे मिळण्यास सुरुवात झाली आहे. आठ ते नऊ किलो गळलिंबू मार्केट यार्डातील फळ बाजारात विक्रीस पाठविली आहेत. एका फळाला शंभर रुपये असा भाव मिळाला आहे.
गळलिंबाचे उत्पादन किफायतशीर
गळलिंबू सोलून खाल्ले जाते. या लिंबाना वैद्यांकडून चांगली मागणी असते. आयुर्वेदात गळलिंबू सेवनाचे फायदे विशद करण्यात आले आहेत. वर्षभरात एका झाडाला शंभर फळे येतात. प्रत्येक फळाचे वजन चारशे ते पाचशे गॅ्रम भरते. दरवर्षी एका झाडापासून दहा हजार रुपये उत्पन्न मिळते. साधारणपणे एक एकरावर गळलिंबांची लागवड केल्यास शेतक ऱ्यांना वीस लाख रुपये उत्पन्न मिळेल. गळलिंबाचे उत्पादन शेतक ऱ्यांच्या दृष्टीने किफायतशीर आहे, असे गळलिंबू उत्पादक शेतकरी सखाराम शिंदे यांनी सांगितले.
गळलिंबू सेवनाचे फायदे
* पचनसंस्थेच्या विकारांवर उपयुक्त
* कोलेस्ट्रोल आणि चरबीवर नियंत्रण
* हृदयविकारावर उपयुक्त
* गळलिंबाच्या सेवनामुळे रक्तशुद्धीकरण