जेजुरी : सलग सुटीमुळे श्रीक्षेत्र जेजुरी येथे भाविक आणि पर्यटकांनी गर्दी केली. कडेपठारच्या डोंगरातील खंडोबा, जेजुरी गडामधील खंडोबा; तसेच जेजुरी – सासवड रस्त्यावरील लवथळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

कडेपठारच्या डोंगरातील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी एक तासभर डोंगर चढावा लागतो. येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. या डोंगराच्या परिसरात हिरवीगार वनराई बहरली असल्याने भाविकांबरोबर पर्यटकांची गर्दी झाली होती. श्रावणी सोमवार असल्याने कडेपठार मंदिर, खंडोबा गड आणि लवथळेश्वर मंदिरामध्ये भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

जेजुरी – सासवड रस्त्यावर असलेल्या प्राचीन लवथळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. पौराणिक कथेनुसार लव ऋषींचे येथे वास्तव्य होते. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी याच शंकराच्या मंदिरात बसून ‘लवथळती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही शंकराची आरती तयार केली. हे प्राचीन मंदिर पडझडीला आले होते. पुरातत्त्व खात्याने नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने मंदिराचे संवर्धन झाले आहे. दरम्यान, ऐतिहासिक पेशवे तलावाच्या काठी असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरातही शंकराच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती.

ढोल – ताशापथकांची हजेरी

ढोल – ताशा पथके जेजुरी गडावर येऊन पथकामधील युवक – युवती ढोल – ताशाचा गजर करून देवापुढे हजेरी देत आहेत. सोमवारी कोथरूड येथील ब्रह्मचैतन्य ढोल-ताशा पथकाने जेजुरी गडावर येऊन ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत ढोल-ताशाचा निनाद केला. श्री मार्कंडेय देवस्थानाचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी ढोल – ताशा पथकाचे स्वागत केले.