पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ सप्टेंबर) शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम आणि सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मोदी यांची जाहीर सभा स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर ते स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या सभेसाठी रवाना होणार आहेत. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे. त्यामुळे समारंभाचे स्थळ आणि सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथके सोमवारी (२३ सप्टेंबर) शहरात दाखल झाली आहेत. केंद्रीय गुप्तचर विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभाग आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

हेही वाचा – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना उद्या मुसळधार पावसाचा इशाऱ्यामुळे सुट्टी

कार्यक्रम स्थळ, लगतचा परिसर, तसेच सभेच्या ठिकाणाभोवतीची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतूक विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला.

हेही वाचा – पुणे : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील सर्व ३२ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना सतर्कचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वान पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास राहणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.