मागील महिन्यातच परतीच्या पावसाने धुमाकुळ घालत पुणेकरांची दैना उडवल्यानंतर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा पावसाने पुणे शहारात जोरदार हजेरी लावली. दुपारी दोन वाजेनंतर सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकादा जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
साधारण तासभरातच पुण्यातील शिवाजीनगर भागात ४३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शहारातील अनेक मार्गांवर पाणी साचले असून वसाहतींमधील घरांमध्येही देखील पाणी शिरले आहे. पावसाचा जोर एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळली आहेत. यामुळे रस्त्यालगत असलेल्या झाडांखाली लावल्या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणा, सिंहगड रोडवर असणार्या काही सोसायटयाच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवसा अडकलेले आहेत. फर्ग्युसन रोड आणि येरवडा भागात झाडं कोसळल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे कालच पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती. ४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. तर ५ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. ६ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यात एकूण २३ नागरिकांचे बळी गेले आहेत.