पुणे : शहरात मंगळवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची तारांबळ उडवली. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने त्यामधून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागली. कोथरूड परिसरातील चांदणी चौक, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील आनंदनगर, माणिकबाग चौकात पाणी साचून रस्त्यांना तळ्याचे रूप आले होते.

शहरात सलग तिसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी चारनंतर वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहिल्या दीड तासातच शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले. यात चांदणी चौक, सिंहगड रस्ता, औंध रस्त्याचा समावेश होता. पुणे-सातारा रस्त्याला पावसाच्या पाण्याने नदीचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी पावसामुळे फ्लेक्स कोसळले. धानोरी, पोरवाल रस्त्यावर पावसामुळे होर्डिंग पडले. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

सणसवाडी आणि फुरसुंगी मंतरवाडी चौक या दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले. अवघ्या एका तासात झालेल्या जोरदार पावसामुळे विमानतळ, कात्रज, धानोरी, हडपसर परिसरातील अनेक भागांत पाणी तुंबले होते. पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शहरातील पावसाळी गटारे यांच्यासह ड्रेनेजलाइन स्वच्छ करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र, अनेक रस्त्यांवर पाणी वाहून जात नसल्याने महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. कोरेगाव पार्क, महात्मा फुले पेठेत, तसेच शिवाजीनगर, आंबेगाव पठार परिसरात झाडाच्या फांद्या रस्त्यावर, तसेच वाहनांवर पडण्याचे प्रकार घडले.

लोहगाव, टिंगरेनगर, सुखसागरनगर भाग २, नऱ्हे, माताजीनगर, आनंदनगर, कर्वेनगर, कोथरूड येथील काही भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या. खडकवासल्याजवळील कोंढवे धावडे, एनडीए, उत्तमनगर परिसरात पावसाने झोडपून काढले. पिरंगुट, लवळे परिसरात वादळी वारा, ढगांच्या गडगडाडसह पावसाने हजेरी लावली होती. पुणे शहरासह जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याचे प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेची पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. महापालिकेचे कर्मचारी, संबंधित अधिकारी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. पावसाचे पाणी साचणाऱ्या नऊ ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करून पाणी वाहून जाण्यातील अडथळे दूर करण्यात आले. – पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका