पुणे : शहरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ५४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करून रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले. सुदैवाने या घटनेत काेणी जखमी झाले नाही.

शहरात मंगळवारी दुपारी पाऊस सुरू झाला. रात्री आठनंतर पावसाचा जोर वाढला. सोसाट्याचा वारा, तसेच पावसामुळे वेगवेगळ्या भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. याबाबतची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून जवानांनी रस्ते वाहतुकीस खुले करून दिले. घोरपडी, धानोरी, कोरेगाव पार्क, येरवडा, एरंडवणे, हडपसर, बावधन, मुकुंदनगर, एरंडवणे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, वारजे माळवाडी, शंकरशेठ रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता), कोथरूड, शिवाजीनगर, घाेरपडी, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत ५४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

सोसायट्यांमध्ये पाणी

शहरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हाॅटेलजवळ असलेल्या एसटी काॅलनीत पाणी शिरले. तसेच वारजे परिसरातील चर्च, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या अर्चना ग्रीन सोसायटीचे आवार, सहकारनगर भाग एक परिसरातील पॅसिफिक हाइट्स सोसायटीच्या आवारात पाणी साचले. विद्युत पंपाद्वारे पाणी उपसण्यात आले.

सीमाभिंत कोसळल्याच्या घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनकवडीतील तीन हत्ती चौकात सीमाभिंत कोसळण्याची घटना घडली, तसेच सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील अक्षय काॅम्प्लेक्स इमारतीतील सीमाभिंत कोसळली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले, अशी माहिती दलाकडून देण्यात आली.