लोणावळा : दोन दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेतल्यानंतर मुंबईकर पर्यटक पुन्हा मोठ्या संख्येने माघारी निघाल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
गेल्या काही दिवसांपासून शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुट्टीचे नियोजन करून पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शुक्रवार आणि शनिवारी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर, तर रविवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर शुक्रवार आणि शनिवारी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ काही काळाचे ब्लाॅक घेत सर्व वाहने सहाही मार्गिका खुल्या करत सोडण्यात येतात. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी होते. तर, रविवारी सर्व वाहने परतीच्या मार्गावर असल्याने मुंबई मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत आहे. रविवारी संपूर्ण घाट परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहन चालकांना या कोंडीचा सामना करावा लागला.