आयटी क्षेत्राबद्दल सगळ्यांनाच एक प्रकारचे आकर्षण. त्यातही प्रामुख्याने या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारे गलेलठ्ठ वेतन हा सर्वांसाठी कौतुकाचा विषय. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडेही एका वेगळ्या आदरयुक्त नजरेने पाहिले जाते. वर्षानुवर्षे तयार झालेल्या या प्रतिमेला तडे जाऊ लागले आहेत. जागतिक पातळीवर घसरणीचे वारे असल्याने आयटी उद्योगावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
देशातील आयटी कंपन्या या प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठांवर अवलंबून आहेत. तेथील अर्थव्यवस्थांमध्ये होत असलेल्या घसरणीचा थेट फटका आयटी कंपन्यांना बसू लागला आहे. त्यामुळे कर्मचारीकपातीचे वारे सुरू झाले आहे. आयटी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग प्रचंड आहे. कृत्रिम प्रज्ञेसह (एआय) इतर नवतंत्रज्ञानामुळे आयटी कंपन्यांच्या कामकाजासह व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. त्यातून त्यांना घरचा रस्ता दाखविला जात आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे पुण्याची ओळख आयटीनगरी अशी आहे. या आयटी पार्कमुळे पुणे केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर पोहोचले. त्यानंतर शहराच्या परिसरात इतर आयटी पार्क सुरू झाली. देशातील, तसेच जगभरातील मोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये पुण्यात आहेत. त्यामुळे जगभरातील घडामोडींचा परिणाम या कंपन्यांवर आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होत आहे.
देशातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएसने जगभरात १२ हजार कर्मचारी कपात करण्याची तयारी केली आहे. त्याचा फटका पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. ही केवळ सुरुवात असून, आगामी काळातील चित्र आणखी भयावह असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
एका मोठ्या आयटी कंपनीने पुण्यातील एका कर्मचाऱ्यावर नोकरी सोडण्यासाठी दबाव आणल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. हा कर्मचारी १२ वर्षांपासून कंपनीत कार्यरत होता. त्याला अचानक नोकरी सोडण्यास सांगण्यात आले. अशाच प्रकारची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. मात्र, याबाबत कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यास कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, आयटीतील कर्मचारी कामगारांच्या व्याख्येत बसत नाहीत. त्यांचे वरिष्ठ पद आणि वेतन या गोष्टी ‘कामगार’ या व्याख्येत बसत नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणांचेही हात बांधलेले असतात. कामगार आयुक्तालयाकडे एखाद्या कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून चर्चा केली. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, कामगार आयुक्तालयाला कायदेशीरदृष्ट्या कंपन्यांना याबाबत सक्ती करता येत नाही, असे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिळवणुकीचे प्रकार
पुण्यात मोठ्या आयटी कंपन्यांसोबत छोट्या आयटी कंपन्यांची संख्याही मोठी आहे. या छोट्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वेतन कमी दिले जाते. याचबरोबर त्यांच्याकडून अधिक काळ काम करवून घेतले जात असल्याच्या तक्रारीही वारंवार केल्या जातात. नुकत्याच काही महिला आयटी कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रार केली होती.
एका छोट्या आयटी कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची बाब फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजने समोर आणली होती. या महिला कर्मचाऱ्यांना हीन वागणूक दिल्याची तक्रार महिला आयोगाकडेही करण्यात आली होती. त्यामुळे आयटी क्षेत्राची चमक वरून दिसत असताना आतून ते पोखरल्याचे दिसून येत आहे.
sanjay.jadhav@expressindia.com