– प्रा. म. वि. वैद्य

सध्या पुणे शहरात अतिउंच इमारतींचे पेव फुटले असून त्या कशा पर्यावरणपुरक आहेत असा प्रचार केला जात आहे. वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती देऊन लोकांना आकर्षित केले जात आहे. पण या इमारती खरोखरच पर्यावरणपुरक आहेत का, यावर मंथन होणे आवश्यक आहे. पुणे शहरात अनेक समस्या आहेत. त्यातच शहरात कमी जागेत खूप वस्ती अशी स्थिती आहे. या साऱ्याचा शहरातील पायाभूत सुविधांवर अतिभार पडतोच आहे. त्यामुळे इमारतींचा उर्जावापर व कर्बउत्सर्जन यावर संपूर्ण अभ्यास होणे गरजेचे आहे.

एक तंत्रज्ञ म्हणून पर्यावरण व उर्जेचा मी ६० वर्षे विद्यार्थी व अभ्यासक आहे व मान्यताप्राप्त पर्यावरण व उर्जा तपासणीसाचे काम केले आहे. एक मानद प्राध्यापक म्हणून मी पदव्युत्तर तंत्रज्ञ व वास्तुविशारद यांना उर्जा व पर्यावरण विषय शिकवले आहे. सध्या हरित हा शब्द प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मला त्यात फार मोठे नवल वाटत नाही. या शब्दाच्या वापराने लोक आकर्षित होतात. बांधकाम क्षेत्रात बघितले तर गवत लावून हिरवळ तयार केली कि झाले पर्यावरणाचे रक्षण ही संकल्पना पसरवली जात आहे, मात्र ती सपशेल चुकीची आहे. हा निव्वळ प्रचार आहे. मोठ्या जाहिराती देऊन लोकांना आकर्षित करणे व नफा वाढविणे हा उद्देश असल्यास नवल नसावे. उंच इमारती दिवसा प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेतात व रात्री ही उष्णता हवेत सोडतात. महापालिकेस उंच इमारतींचा हव्यास सोडावासा वाटत नाही, याचा फायदा बांधकाम क्षेत्रात घेतला जातो. 

पैसा झाला मोठा असे, म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. उंच इमारतीत सौर उर्जा निर्मिती केली जाण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. इमारती उष्णता कशा शोषून घेतात याचे अगदी साधे उदाहरण- आम्ही एका मोठ्या कंपनीची ऊर्जावापर तपासणी करताना असे दिसले की इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर हॉलमध्ये वीजवापर खूप जास्त होता. संपूर्ण इमारतीची पाहणी केली असता छतावरची फरशी दिवसा प्रचंड उष्णता शोषून घेत होती असे दिसले, मग उष्णतारोधक चटया बसविल्यावर वातानुकुलीतसाठीचा वीज वापर कमी झाला. सूर्य भर उन्हात सरसरी ४ kwh प्रती वर्ग मीटर म्हणजे ३४४० किलोकॅलरी इतकी उष्णता भूभागावर देत असतो. हा उन्हाचा काळ सरासरी ४-५ तास तरी असतो. उंच इमारती त्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेतात व हीच उष्णता रात्री बाहेर टाकली जाते. मोकळी भूमी असेल, तर सर्व ऊर्जा जमिनीत जाते. झाडे लावली तर ही उर्जा वापरली जाते. पण बहुसंख्य उंच इमारतींत अतिशय कमी झाडे असतात त्यासाठी माणशी कमीतकमी २-३ झाडे लावणे बंधनकारक करावे. सर्व उंच इमारती प्रचंड प्रदूषण करतात असे म्हणणे फारसे वावगे नाही. दुसरी बाब म्हणजे या सर्व इमारतींत मोठ्या प्रमाणात काच वापरली जाते त्यामुळे उजेड येतो पण घरात उष्णता वाढते व वातानुकूलन यंत्रणेचा अधिक वापर होतो. कर्बउत्सर्ग वाढतो.

तिसरा मुद्दा म्हणजे या सर्व इमारतींना लिफ्ट अनिवार्य असून काही उंच इमारतींचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले कि या लिफ्ट वार्षिक सरासरी माणशी १००-१३० युनिट्स वीज वापरतात. यावर अजून जास्त काम करणे गरजेचे आहे. या सर्व वीजवापराचा शेवट कर्बउत्सर्गात होतो. सरासरी प्रत्येक वीज युनिटमागे ०.८५ किलो कर्बउत्सर्ग होतो. आता तर ई-वाहने आली आहेत ती हरित होण्यास अपारंपरिक वीज वापरणे अनिवार्य आहे. म्हणजे सर्व इमारतींनी त्यासाठी सौर उर्जा निर्मिती करणे बंधनकारक आहे असे समजते. पण प्रत्यक्षात सौर उर्जेचा किती वापर केला जात आहे हे बाबुशाहीने तपासणे गरजेचे आहे.

बांधकाम व्यावसायिक आपला प्रकल्प पर्यावरणाशी सुसंगत आहे, अशी जाहीरात करतात हे तर आता नेहमीच दिसून येते पण बहुमजली इमारतीच्या प्रकल्पात मोकळ्या जागेत किती झाडे लावली व जगविली तसेच प्रत्यक्षात किती सौर उर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली तसेच पर्जन्य जल साठविण्याची सोय निर्माण केली का याचा अजिबात उल्लेख नसतो. पुणे महापालिका याची दाखल घेते की नाही हे मला माहीत नाही. इमारतीला पुरेल इतकी सौर उर्जा निर्माण करण्यासाठी महापालिकेने पावले उचलणे गरजेचे आहे.

अशातच पर्यावरण पूरक प्रकल्प म्हणून प्रचारासाठी जमिनीवर गवत लावून जमीन कशी हिरवीगार आहे असा फोटो देऊन उल्लेख केलेला असतो. हे तर अत्यंत हास्यास्पद आहे कारण हिरवळीमुळे कर्ब उत्सर्ग फारसा कमी होत नाही. सर्व बहुमजली इमारतींचे उर्जा व पर्यावरण ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे. असे केल्याने पुण्याची कर्ब उत्सार्गाने कशी अवस्था होत आहे हे चित्र बाहेर येईल.

पुण्यात दरवर्षी सुमारे ५० हजारांहून अधिक सदनिका बांधल्या जातात व त्यात साधारणपणे एक लाख ८० हजार लोक राहतात, असे गृहीत धरल्यास त्यांच्याकडून कमीतकमी साडेतीन ते चार लाख टन कर्ब उत्सर्ग होत असावा असा अंदाज करता येतो. पुण्यात गेली काही वर्षे कमी वेळात बराच पाउस पडणे प्रचंड पाणी साठणे या प्रकारांत वाढ होत आहे हे वाढत्या हवामानबदलांमुळे व अवैध बांधकामांमुळे तसेच नैसर्गिक ओढे नाले बुजविल्यामुळे होते असा निर्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही. बहुमजली इमारतीत सौरशक्तीवर गरम पाण्यासाठी व्यवस्था असते परंतु वापरासाठी अपवाद वगळता कोळशावरच्या विजेचाच वापर होतो.

एक पर्यावरण व ऊर्जा अभ्यासक म्हणून येत्या काही वर्षांत भारतात काय घडेल याचा अंदाज मांडू पाहता, असे दिसते की, पूर्व समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी येणाऱ्या वादळांचे प्रमाण आणि तीव्रता वाढत जाईल. ढग फुटीसारखे प्रकार वाढतील व पाणी साठून नुकसान होईल. भारतात आतापर्यंत पश्चिम किनारा त्यापासून दूर होता पण आता तिथेही परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. आताच जर पावले उचलली नाहीत तर आपणास फार मोठ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल.

(लेखक बहुराष्ट्रीय कंपनीतून कार्यकारी संचालक म्हणून निवृत्त)

mvnmvaidya@gmail.com