गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सामान्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने उच्चशिक्षितांपासून सामान्यांची हातोहात फसवणूक करण्यात येत आहे. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या दररोज दोन ते तीन तक्रारी पोलिसांकडे दाखल होतात. गेल्या सहा महिन्यांत शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगल्या परताव्याच्या आमिषाने पुण्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून पुण्या-मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांत फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. डाॅक्टर, संगणक अभियंत्यांसह अनेक उच्चशिक्षित चोरट्यांच्या आमिषांना बळी पडले आहेत. काही जणांनी तर कर्ज काढून सायबर चोरट्यांना रक्कम दिली आहे.

अशा प्रकारच्या फसवणुकीत सुरुवातीला चोरट्यांकडून समाजमाध्यमांत संदेश पाठविण्यात येतो. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात येते. चोरट्यांकडून एक लिंक पाठविण्यात येते. लिंकवर शेअर बाजारातील गुंतवणुकीची संधी, फायदे याबाबतची माहिती दिलेली असते. संदेश वाचून काही जण संदेशातील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधतात आणि तेथेच ते चोरट्यांच्या जाळ्यात अलगद सापडतात.

संपर्क साधल्यानंतर चोरट्यांच्या साथीदार महिला संवाद साधतात. त्यांच्या लाघवी बोलण्यावर विश्वास ठेवून काही जण पैसे भरायला तयार होतात. सुरुवातीला एक लाख रुपये गुंतवा, असे सांगण्यात येते. गुंतवणूक आणि परताव्याची माहिती ॲपद्वारे समजेल, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले जाते. साधारणपणे एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. परताव्याची रक्कम ॲपवर दिसल्याने समोरच्याचा विश्वास वाढतो आणि तो पैसे गुंतवत जातो.

जास्तीत जास्त रक्कम गुंतविल्यास परतावाही मोठा मिळेल, असे सांगून चोरटे रक्कम उकळतात. अनेकदा मित्र, नातेवाईक वा प्रसंगी बँकेकडून कर्ज काढून रक्कम गुंतवली जाते. एकदा का मोठी रक्कम गुंतविली, की चोरट्यांचे काम सोपे होते. एकीकडे ॲपवर परतावा वाढल्याचे दिसत असल्याने ‘गिऱ्हाईक’ खुशीत असतो. परताव्याची रक्कम काढण्यासाठी तो प्रयत्न सुरू करतो, तेव्हा रक्कम त्वरित मिळत नाही. चोरटे बतावणी करत राहतात. एक ते दोन दिवसांत रक्कम मिळेल, असे सांगून वेळ मारून नेतात. त्यानंतर चोरटे ‘गिऱ्हाईका’चा मोबाइल क्रमांक ‘ब्लाॅक’ करून टाकतात किंवा स्वत:चा क्रमांक बंद करतात. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

पोलिसांकडे तक्रार देणारे तक्रारदार हे डाॅक्टर, सनदी लेखापाल, संगणक अभियंते, नोकरदार, व्यावसायिक आहेत. चोरटे फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करतात. विविध राज्यांतील बँक खात्यांत रक्कम जमा झाल्यानंतर पैसे काढून घेतले जातात. चोरटे परदेशातूनही ऑनलाइन पद्धतीने रक्कम काढून घेतात. ज्या खात्यात रक्कम वळविण्यात आली आहे, त्या खातेदाराविषयीची माहिती पोलीस तपासात त्वरित मिळत नाही. आरोपी परराज्यांतील असल्याने पोलिसांना त्यांचा माग काढताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागते. चोरट्यांकडून वापरण्यात येणारे समाजमाध्यमातील समूहाचे क्रमांक (आयपी ॲड्रेस) परदेशातील असतात. बँकांकडून अनेकदा खातेदारांची माहिती योग्य पद्धतीने संकलित करण्यात येत नाही. त्यामुळे ज्या खात्यात रक्कम वळविण्यात आली आहे, त्या खातेदाराची पूर्ण माहिती किंवा पत्ता मिळत नाही.

मुद्दा असा, की ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सजग राहायला हवे. मान्यताप्राप्त शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून व्यवहार करावेत. डीमॅट खाते, शेअर दलालाचा क्रमांक (ब्रोकर आयडी), बँक खात्याची खातरजमा करावी. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एखाद्याने संपर्क साधल्यास किंवा संदेश पाठविल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. आमिषांना बळी पडू नये. हे माहीत असले, तरी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात उच्चशिक्षित सापडत असल्याने ही बाब चिंता करण्याजोगी बनत आहे. थोडी सजगता दाखविल्यास अशा प्रकारच्या फसवणुकींच्या गुन्ह्यांना आपोआप आळा बसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rahul.khaladkar@expressindia.com