पिंपरी-चिंचवड: आयटी हब हिंजवडीत पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी हिंजवडीचा दौरा करून परिस्थिती बदलेली नाही. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आज पाहणी करून तोडगा काढण्याच आश्वासन दिलं आहे. ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ च्या माध्यमातून पोलीस आयुक्तांसोबत बैठक पार पडली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेतील सचिन लोंढे, सचिन गुणालेसह महानगर पालिका अधिकारी बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार आदी उपस्थित होते. बैठकीत काही ठिकाणं निश्चित करण्यात आली. जिथं वाहतूक कोंडी होते. ही बैठक दोन तास चालली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतुक कोंडीसह इतर समस्यांसाठी पहाटे दौरे केले. अधिकाऱ्यांना, स्थानिक नेत्यांना माध्यमांसमोर झापल. पण, याचा परिणाम फार काळ टिकला नाही. सध्या हिंजवडीत विविध ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडीच्या दहा ठिकाणा पैकी काही ठिकाणी चौबे यांनी भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.
सध्या आयटीहबमधील वाहतूक कोंडीबद्दल एमआयडीसी, मेट्रो प्रशासन, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी मौन धारण केल आहे. असा आरोप सचिन लोंढे यांनी केला आहे. वाहतूक कोंडीबद्दल म्हसे शब्द ही काढायला तयार नाहीत. अस लोंढ यांचं म्हणणं आहे. एकीकडे हिंजवडी वाहतूक कोंडीमुक्ती कधी होणार? असा प्रश्न असून अजित पवारांना आणखी लक्ष देण्याची गरज असल्याच बोललं जातं आहे.
कुठे होते वाहतूक कोंडी?
वाकड – हिंजवडी पूल, सावता माळी मंदिर (हिंजवडी पूल), हिंजवडी इंडियन ऑइल पेट्रोल पंप चौक, छत्रपती शिवाजी महार चौक, भुजबळ चौक, फिनिक्स मॉल रोड, वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटी, मिसिंग लिंक रोड (फिनिक्स मॉल), काळा खडक सिग्नल, डांगे चौक