पुणे : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरभर फलकबाजी जोरात असून, आगामी महापालिका निवडणुकीची ही ‘रंगीत’ तालीम शहर विद्रूप करणारी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदा फलक लावण्याबाबत आपापल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बजावूनदेखील त्याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसत आहे. इतरही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते फलकबाजीत मागे नसल्याचे चित्र आहे.

या फलकांवर कारवाई करून ते काढून टाकण्याची हिंमत महापालिका प्रशासनाने अजून तरी दाखवलेली नाही. बेकायदा जाहिरातफलकांवर प्रशासन कारवाई करत नसेल, तर प्रशासनातील अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी स्वयंसेवी संघटनांकडून केली जात आहे.

शहरातील अनेक भागांत राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेकायदा जाहिरात फलक लावले आहेत. हे फलक लावताना सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने हे फलक पडून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येदेखील हेच चित्र आहे.

सण-उत्सवांच्या जाहिराती, माहिती, शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, पक्ष संघटनेवर निवड-नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा यांसह अगदी भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देणारे फलकही शहरात झळकले आहेत. अनेकदा वाहतूक नियंत्रण दिव्याच्या समोरच मोठ्या आकाराचे जाहिरातफलक उभारले जात असल्याने वाहतूक दिवे झाकले जातात. त्यामुळे त्याचा पादचाऱ्यांसह चालकांनादेखील त्रास होतो.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस शहरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्या वेळी त्यांनी, ‘शहर विद्रूप करणाऱ्या अनधिकृत फलकांवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फलक लावण्याची खुमखुमी आहे, त्यांनी अधिकृत होर्डिंगवर जाहिरातबाजी करावी,’ अशा शब्दांत सुनावले होते. शहरातील बेकायदा जाहिरातफलक काढून टाकण्याच्या सूचनाही सर्व महापालिका आयुक्तांना दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतरही अनधिकृत फलक झळकत असल्याचे चित्र आहे.

शहरातील ज्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये बेकायदा पद्धतीने जाहिरातफलक उभारण्यात आलेले आहेत, त्यांवर कारवाई करून ते तातडीने काढून टाकावेत, असे सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहायक आयुक्तांना कळविण्यात आले आहे. या कारवाईचा आढावा घेतला जाईल. – संतोष वारुळे, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग, पुणे महापालिका

अनधिकृत फलक लावणाऱ्यांना महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही, असे राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केले पाहिजे. प्रसंगी त्यांची अंमलबजावणी करण्याची तयारी ठेवल्यास बेकायदा पद्धतीने उभारण्यात येणारे फलक आपोआप बंद होतील. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही भूमिका घ्यावीच. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच