जुनी हिंदी गाणी ऐकली, की मनात जुन्या आठवणी दाटतात. तशीच काही झाडं, काही फुलं भेटली की मन ‘नॉस्टॅल्जिक’ होतं. म्हैसूर स्पोर्ट्स क्लबच्या दारात डेझीचा भरगच्च वाफा पाहिला अन् आठवला माझ्या बालपणीच्या बंगल्यातील पोर्चचा डेझीचा वाफा. छोटी छोटी रोपं, पातीची लांब पानं, जांभळय़ा नाजूक पाकळय़ांमध्ये पिवळाधम्मक गोल. अतिशय आकर्षक दिसत ही फुले.

ऋतूनुसार फुलणारी रंगबिरंगी फुले बागेला उठाव देतात. यात विविधता खूप. त्यामुळे आवडीनुसार रंग निवडता येतात. या ‘सिझनल’ फुलांसाठी प्लॅस्टिकच्या, मातीच्या छोटय़ा कुंडय़ा, टेराकोटाच्या आकर्षक, वेगवेगळय़ा आकारांच्या कुंडय़ा, बांबूच्या टोपल्या अथवा लटकणाऱ्या कुंडय़ा वापरता येतात. या कुंडय़ा भरण्यासाठी सेंद्रिय माती व कोकोपीथ निम्मे निम्मे मिसळून कुंडी भरावी. नर्सरीतून रोपं आणता येतात किंवा खूप रोपं लावायची असल्यास बाजारात बियांची पाकिटे मिळतात. एखाद्या टोपलीत कोकोपीथ घालून भिजवावे, वर बी भुरभुरावे, वरून परत कोकोपीथचा पातळ थर द्यावा. दहा-बारा दिवसांत रोपं येतील. या नाजूक रोपांना छोटय़ा झारीने अलगद पाणी द्यावे. छोटे वाफे, आडव्या कुंडय़ा, लटकत्या कुंडय़ांमध्ये शोभणारा रंगबिरंगी पिटुनिया खूपच लोकप्रिय आहे. जांभळय़ा, गुलाबी, गर्द राणी, पांढरी गुलाबी मिश्र अशा अक्षरश: असंख्य रंगछटांमधील फुले हे याचे वैशिष्टय़. पिटुनिया नाजूक प्रकृतीचा. फुले अल्पजीवी. बी लावण्यापेक्षा रोपवाटिकेतून रोपं आणणं सोयीचं. बऱ्याच वेळा मोठय़ा झाडांच्या सावलीमुळे किंवा बाल्कनीत कमी ऊन येतं. अशा वेळी विविध रंगांत उपलब्ध असणारा, काडी खोचली की सहज रुजणारा बाल्सम लावावा. पांढरी, शेंदरी, गुलाबी, जांभळी, आमसुली रंगांची फुले बाल्सम बागेत उधळतो. याला पाणी आवडते. ऊन कमी असले तरी चालते. नाजूक दिसले तरी चिवट असते. पायऱ्यांवर, दिवाणखान्यात, बाल्कनीत छोटय़ा कुंडय़ांत फारशी देखभाल न करता बाल्सम खुलतो.

राष्ट्रपती भवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मोठय़ा उद्यानांमध्ये अग्रभागी असणारे उंच, लालबुंद तुरे ‘सिल्व्हिया’चे. याची शोभा खूप रोपं एकत्र लावली तरच दिसते. त्यामुळे प्रवेशद्वाराशी एखाद्या वाफ्यात सलग रोपं लावावीत. मागे उंच लाल तुरे व पुढे पिवळा ग्लाडिया अशी रंगसंगती सुंदर दिसते. पिवळय़ा फुलांसाठी बुटका लॅन्टाना पण कमी कष्टात बागेस शोभा देतो.   फ्लॉक्सची कातरलेल्या पाकळय़ांची, मोहक रंगांची फुले रोपवाटिकेत आपले लक्ष वेधतात, पण ही रोपंसुद्धा जास्त संख्येने लावली तर छान दिसतात. फार अल्पजीवी व नाजूक असतात. रोपवाटिकेतून आणल्यावर काळय़ा पिशवीतून काढून हलक्या हाताने मुळांभोवतीची माती मोकळी करून कुंडीत लावावे, अन्यथा पिशवीतल्या मातीच्या घट्ट गोळय़ात ती गुदमरतात व मरतात. फ्लॉक्सचे सौंदर्य त्याच्या कातरलेल्या पाकळय़ा व त्यावरील रंगीत  शिंतोडे यात आहे. याची रोपं बी पासून करता येतात.

जांभळा, पांढरा, फिकट गुलाबी बारी फुलांचे गुच्छ असलेला व्हर्बिना, याची कातरलेली पाने अन् वेलीसारख्या फांद्याही छान दिसतात. हिरवळीच्या कडेला अथवा बाल्कनीत आडव्या कुंडीत व्हर्बनिा छान दिसतो. फांद्या रुजवून नवी रोपं करता येतात.

पांढरा, गर्द जांभळा, गर्द गुलाबी रंगाचा अ‍ॅस्टर दणकट प्रकृतीचा. फुले पण दीर्घजीवी असतात. वाफ्यात अगर कुंडीत रोपं लावावीत. कुंडीत दोन-चार रोपं एकत्र लावावीत. फुले पुष्परचनांसाठी, रांगोळीसाठी वापरता येतात. बियांपासून रोपं करता येतात.

अ‍ॅस्टरसारखीच दणकट प्रकृती झिनियाची. आमच्या ‘मेरी’ कॉलनीत हा रानोमाळ उगवलेला दिसे. रोप एक दीड फूट किंवा जास्तही उंच असत. त्यावर गर्द केशरी, जांभळा, गुलबक्षी, गुलाबी रंगांची फुले येत. आता झिनियाची बुटकी रोपं मिळतात, पण किती महाग! आजूबाजूला रानमाळ शिल्लक नाहीत. त्यामुळे रोपवाटिकेतच याची उपलब्धता आहे.दिमाखदार उंची अन् नाजूक पाकळय़ांचे आकर्षक फुलांचे ‘हॉलीहॉक’ पूर्वी बहुतेक बंगल्यांच्या प्रवेशद्वाराशी असायचेच. याची भेंडीच्या, अंबाडीच्या फुलांसारखी फुले फुलपाखरांना फार आवडतात. गर्द जांभळा, आमसुली, पांढरा, गुलाबी अनेक रंग मिळतात. ‘हॉलीहॉक’ सोसायटीच्या उद्यानात जरूर लावावा. बियांपासून रोपं करता येतात. रंगाचा उत्सव करणाऱ्या या फुलांच्या नाना तऱ्हा, अनेक जाती, खूप विविधता सगळय़ांनाच आपण बागेत स्थान देऊया. पण माझ्यासाठी खास आहेत हॉलीहॉक, डेझी, अ‍ॅस्टर अन् झिनिया.. कारण अर्थात नॉस्टॅल्जिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)