विद्याधर कुलकर्णी
वाचनाची आवड आहे, पण ग्रंथालयात जाऊन पुस्तक बदलून आणण्यासाठी वेळ नाही, अशा वाचनवेड्यांसाठी ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ पुण्यामध्ये आली आहे; तीही ‘घरपोच ग्रंथालय’ ही सेवा घेऊन. ‘मेक बुक्स युवर फ्रेंड्स’ ही संकल्पना राबवित डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तकांच्या घरात जवळपास चार लाखांहून अधिक पुस्तके आहेत. ही सगळी पुस्तके वाचकांना घरपोच मिळणार आहेत, तीही एका ‘क्लिक’वर.
पै फ्रेंड्स लायब्ररी नावाच्या संकेतस्थळावर जाऊन मागणी करायची आणि त्यानुसार, मराठी, इंग्रजी पुस्तके, मासिके आणि अगदी दिवाळी अंकसुद्धा मिळतील. वाचकांची ही मागणी भावार्थ पुस्तकालयाच्या माध्यमातून घरपोच सेवेद्वारे पूर्ण होईल. वाचनाची भूक माणसाला अस्वस्थ करत असते. त्यासाठी वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. पण, पुस्तकांच्या वाढत्या किमती आणि खिशाचा विचार करता पुस्तकांची खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही. त्यातूनच ग्रंथालयांचे सभासद होण्याकडे कल वाढलेला दिसतो.
‘लोकहितवादी’ गोपाळ हरी देशमुख यांनी स्थापन केलेले पुणे नगर वाचन मंदिर, नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालय आणि सदाशिव पेठ येथील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषद अशी शताब्दी पार केलेली ग्रंथालये पुण्यामध्ये कार्यरत आहेत. मात्र, शहरातील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता या ग्रंथालयांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये असलेल्या या ठिकाणी वाहतूककोंडीमुळे वेळेत पोहोचणे आणि गाडी लावण्यासाठी जागा मिळविणे दुरापास्त झाले आहे.
शहराचा झालेला विस्तार ध्यानात घेऊन पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे मराठी ग्रंथालयाच्या उपनगरांमध्येही शाखा कार्यरत आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीदेखील वाचकांपर्यंत पुस्तके घेऊन जाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ‘ग्रंथालयाची घरपोच सेवा’ ही बाब पै फ्रेंड्स लायब्ररीने अचूकपणे हेरली आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
घरपोच ग्रंथालय योजनेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास सवलत आहे. दरमहा सभासदांना शब्दमंच, भावार्थ मैफल, शब्दयात्री, बालसाहित्य महोत्सव, कुमारोत्सव यांसारख्या विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी मिळेल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी कला, साहित्य, संगीत आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचाही लाभ घेता येणार आहे. ‘भावार्थ’च्या सभासदांना पुस्तकांची खरेदी, तसेच कार्यशाळा शुल्कावर सवलत देण्यात आली आहे.
पुस्तके कशी मिळतील?
या ग्रंथालयाचे पुण्यातील अंमलबजावणी केंद्र कोथरूडमधील कर्वे पुतळ्याजवळ असलेले ‘भावार्थ’ आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या संकेतस्थळावर जाऊन घरपोच ग्रंथालयासाठी सदस्य झाल्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. यामध्ये तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी सदस्यत्व नोंदणी करायची. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्याला प्रत्येकी चार पुस्तकांची मागणी करायची. मागणी केल्यानंतर पै फ्रेंड्स लायब्ररीकडून ही पुस्तके ‘भावार्थ’ पुस्तकालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर ‘भावार्थ’चे कार्यकर्ते वाचकांपर्यंत, त्यांनी मागणी केलेली पुस्तके घरपोच देणार आहेत. आधीची पुस्तके परत केल्यानंतर पुढची पुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे वाचकांना घरबसल्या पुस्तके मिळणार असून, त्यांची ज्ञान आणि माहिती मिळविण्याची भूक भागविली जाणार आहे.
vidyadhar.kulkarni@expressindia.com