पुणे : शहरात जून महिन्यांत सुमारे १० दिवसांत सरासरी ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभर शहर आणि परिसरात संततधार सुरू होती. जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर कायम होता. घाट परिसरवगळता शहराच्या उपनगरांत आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाचा फारसा जोर नव्हता.
हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, शहरात जून महिन्यात सुमारे दहा दिवसांत सरासरी ७८ मिमी पाऊस झाला आहे. दोन जूनला ७.१ मिमी, पाच जूनला १३.३, १७ जूनला ०.२, १८ जूनला ०.१ मिमी पाऊस झाला होता. साधारण २५ जूननंतर पुण्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला. २५ जूनला १४.२, २६ जूनला १०.८, २७ जूनला ७, २८ जूनला १५, २९ जूनला १०.३, तर ३० जूनला सकाळी साडेआठपर्यंत सहा मिमी पावसाची नोंद शिवाजीनगर परिसरात झाली आहे.
हेही वाचा – पर्यटकांचं आकर्षण असलेलं लोणावळ्यातील ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो
दरम्यान, शुक्रवारी शहर आणि परिसरात सरासरी १०.३ मिमी पाऊस झाला. पाषाण येथे १४.७ मिमी, लोहगाव येथे १४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा घाट परिसरवगळता अन्यत्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.