पुणे : महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या दाखल गुन्ह्यात पतीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार दंड अशी शिक्षा सुनाविण्यात आली. सासू-सासऱ्यांना सहा महिने शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरुमपल्ली यांनी याबाबतचे आदेश दिले.
पती प्रशांत संपत कोंडे (वय ४२), सासरे संपत बाबुराव कोंडे (वय ७५), सासू सुरेखा संपत कोंडे (वय ६७, रा. केळवडे, ता. भोर, जि. पुणे) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. ज्योती प्रशांत कोंडे यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. ज्योती यांनी २९ डिसेंबर २०१४ रोजी राहत्या घरात अंगावर राॅकेल ओतले होते. पती प्रशांत याने पेटती काडी अंगावर टाकल्याने त्या गंभीर भाजल्या. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ज्योती यांनी मृत्यूपूर्व जबाब दिला. त्यानुसार, पती प्रशांत, सासरे संपत, सासू सुरेखा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी बाजू मांडली. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील गेहलोत यांनी केली.
न्यायालयाने साक्ष, तसेच पुरावे ग्रााह्य धरून सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पतीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तसेच सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासू, सासऱ्यांना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. राजगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शाहूराव साळवे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत, हवालदार साहेबराव बाबर यांनी न्यायालयीन कामकाजात साह्य केले.