पुणे : नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी पती प्रेम जाधव (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. ममता जाधव (वय २१) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. रेश्मा राठोड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता जाधव आणि आरोपी पती प्रेम जाधव यांचे २०२० मध्ये लग्न झाले. प्रेम जाधव याला दारूचे व्यसन होते. तुम्ही सोडून द्या, असे वारंवार सांगूनदेखील पती दारू सोडत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये वाद होत होते. त्यामुळे ममता ही तिच्या कुटुंबियासोबत लोहगाव परिसरात काही महिन्यांपासून राहत होती.
पत्नी ममता जाधव हिने नांदण्यास यावे म्हणून प्रेम जाधव अनेक वेळा तिच्या संपर्कात होता. तुम्ही दारू सोडली तरच मी नांदण्यास येईल, असे प्रत्येकवेळी ममता प्रेमला सांगायची. काल रविवारी दुपारच्या सुमारास प्रेम जाधव हा ममताला भेटण्यास लोहगाव येथील घरी गेला होता. तू नांदण्यास चल, असे पती प्रेम जाधव म्हणाला, त्यावेळी पुन्हा एकदा दोघांमध्ये भांडणं झाली. भांडणात प्रेम जाधव याने पत्नी ममता हिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. त्यावेळी घराबाहेर बसलेल्या फिर्यादी रेश्मा राठोड यांना आरडाओरड ऐकू आल्याने घरात जाऊन पहिले असता आरोपी प्रेम जाधव हा पत्नीवर चाकूने वार करीत असल्याचे दिसून आले. आरोपीला अडविण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या हातावर चाकूने वार करून आरोपी प्रेम जाधव हा पळून गेला.
ममता जाधव यांना जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर या घटनेतील आरोपी प्रेम जाधव याला काही तासांत अटक करण्यात आल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी दिली.