चाकणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या सात वर्षीय मुलीसमोरच पत्नीचा चाकूने वार करून खून केला आहे. आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आज पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना तिच्या गळ्यावर वार करून त्यांने तिचा खून केला. सचिन काळेल असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमध्ये काळेल कुटुंब राहात होतं. आरोपी सचिन हा एका कंपनीत कामाल होता. तर, पत्नी अश्विनी दोन दिवसांपासून कामाला जात होती. परंतु, सचिन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आज पहाटेच्या सुमारास सचिनने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा सुरुवातीला गळा आवळून आणि मग चाकूने वार करून खून केला.
धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सात वर्षीय मुलीसमोर घडल्याचं चाकण पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोपी सचिन हा फरार झाला आहे. मुलीने शेजारी राहणाऱ्या तिच्या काकाला ही बाब सांगितली. त्यानंतर चाकण पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकरणी सचिनचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.