‘‘इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’च्या (आयडीएस) मुख्यालयाकडून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये संरक्षण दलांकडून ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणांच्या क्षमतांची चाचणी होईल,’ अशी माहिती ‘आयडीएस’चे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिन्हा यांनी दिली.‘मानवरहित विमानविरोधी आणि हवाई संरक्षण यंत्रणा – आधुनिक युद्धपद्धतीचे भविष्य’ यावर नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एअर मार्शल सिन्हा बोलत होते.
या सरावाचे नाव ‘कोल्ड स्टार्ट’ असे ठेवण्यात आले असून, मध्य प्रदेशात ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान हा सराव होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरावात तिन्ही दले, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. लष्करातील वरिष्ठ अधिकारी, संरक्षण क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधी आणि विविध तज्ज्ञ परिषदेला उपस्थित होते.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान संरक्षण दलांनीही काही धडे शिकले आणि लष्करी विचार आणि नियोजनामध्ये शत्रूपेक्षा चार पावले पुढे असण्याची गरज एअर मार्शल सिन्हा यांनी व्यक्त केली.महिनाभरापूर्वीच मध्य प्रदेशातील महू येथे ‘रण संवाद’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात तिन्ही दलांतील अधिकारी सहभागी झाले होते. तिन्ही दलांच्या समन्वयातून युद्ध युद्धपद्धतीवर या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
आम्ही काही ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणांची चाचणी सरावादरम्यान करणार आहोत… भारताची हवाई संरक्षण यंत्रणा आणि मानवरहित विमानविरोधी यंत्रणा अधिक सक्षम असावी, हे उद्दिष्ट त्यामागे आहे.एअर मार्शल राकेश सिन्हा, उपप्रमुख ‘आयडीएस’