पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठका, मेळावे घेतले जात आहे. तर विरोधकांमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चे काढले जात आहे. या सर्व घडामोडींत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यातील विश्वासू सहकारी माजी खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान संजय काकडे यांच्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार हे देखील होते. या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संजय काकडे यांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, माझे मित्र शंकर पवार यांच्या एका वैयक्तिक कामासाठी शरद पवार यांची भेट घेतली. मागील ४० वर्षांपासून राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझे आणि शरद पवार यांचे संबध आहेत. त्यामुळेच आज मित्राच्या कामासाठी भेटलो. मी तुमचे नक्की काम करतो काहीही अडचण नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो.

हेही वाचा – नवसाक्षरता अभियानाकडे पुणे जिल्ह्याची पाठ, आतापर्यंत अत्यल्प नोंदणी

तुम्ही शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय संकेत मिळत आहेत. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी माझ्या मित्राच्या कामासाठी आलो होतो. तसेच माझ्या पक्षातील लोकांचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझे त्यांच्याशी काही देणे घेणे नाही. या भेटीबाबत स्पष्टीकरण विचारल्यावर मी योग्य असे स्पष्टीकरण देईल, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

हेही वाचा – राज्य मंडळाच्या शुल्क परताव्याला तांत्रिक अडचणींचा फटका… झाले काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळी आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या प्रश्नावर संजय काकडे म्हणाले की, मागील २० वर्षांपासून बच्चू कडू यांना ओळखतो. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जातील, असे वाटत नाही. तसेच त्यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. यामुळे ते कोणत्याही पक्षात जाण्याचा धोका पत्करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.