पिंपरी : नकारात्मक कोणीही बोलायचे नाही. नकारात्मक बोलणाऱ्यांनी जेवण करावे आणि बाहेर पडावे. नकारात्मक बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे, अशी तंबी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय मेळावा सोमवारी (८ एप्रिल) काळेवाडी येथे पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, सुनील शेळके, उमा खापरे, आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-पिंपरी : महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य! बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. उरणमध्ये विरोधक ज्या आठ पदरी रस्त्यावरून आले आणि आम्हाला शिव्या घालून गेले. तो रस्ता आम्ही केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कधीच कार्यकर्त्यांची दुःखे जाणून घेतली नाहीत. स्वतःचा चेहरा कोणाला दाखवत नव्हते. मावळमध्ये सहाही आमदार महायुतीचे आहेत. या आमदारांच्या मताधिक्याची बेरीज केल्यास बारणे हे मागीलवेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील. कोण हसला नाही, बोलला नाही, माझ्याकडे बघितले नाही असे कारणे देऊन कोणी नाराज होऊ नये. गट-तट, मानअपमान हे विसरून जावे. नेत्यांनी उमेदवार ठरवले आहेत. त्यामुळे मानसन्मान बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.

मंत्री अनिल पाटील म्हणाले, की देशाच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत आलो आहे. उमेदवार कोण आहे, याच्याशी काही देणेघेणे नाही. नेत्याने घेतलेल्या निर्णयासाठी झोकून देऊन काम करावे.

आणखी वाचा-‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार सुनील शेळके म्हणाले, की मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची लढत झाली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी काम केल्यास तिन्ही विधानसभा मतदारसंघातून दोन लाख मताधिक्य मिळेल. महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्या अगोदर जाहीर झाला आहे. त्यांचा एक दौरा पूर्ण झाला आहे. आपण पाठीमागे आहोत. महायुती म्हणून आपल्याला संयुक्तपणने बूथ प्रमुखांची बैठक घेतली पाहिजे. माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, मावळमध्ये नात्यागोत्याचा प्रयोग सुरू झाला आहे. परंतु, आपल्याला महायुतीचा मावळ लोकसभेत पाठवायचे आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसले.