डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात राष्ट्रीय निषेध कार्यक्रमात सहभाग

पुणे : करोना काळात जीवाची बाजी लावून रुग्णसेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवर देशाच्या कानाकोपऱ्यात हल्ले होत आहेत. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय शाखेने शुक्रवारी निषेध दिवस पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे डॉक्टर काळ्या फिती लावून या निषेध कार्यक्रमाला आपला पाठिंबा दर्शवणार आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आयएमए पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी निषेध दिवसाबाबत माहिती दिली. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ आयएमए हा राष्ट्रीय दिन पाळत असून जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे रक्षण करा असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे.

डॉ. संजय पाटील म्हणाले, मागील दीड वर्षांपासून डॉक्टर करत असलेली रुग्णसेवा सुरू राहील मात्र डॉक्टरांवरील भ्याड हल्यांबाबत निषेध व्यक्त करत राहू. शुक्रवारी निषेध दिनाचे औचित्य म्हणून आयएमएचे डॉक्टर काळ्या फिती, काळी मुखपट्टी लावून काम करतील. जिल्हाधिकारी आणि स्थानिक महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले जाईल तसेच माध्यमे आणि समाज माध्यमांच्या मदतीने डॉक्टरांची बाजू समाजापर्यंत पोहोचवली जाईल. सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट के ले.

डॉ. बी. एल. देशमुख म्हणाले, सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधातील गुन्हे जलदगती न्यायालयांमध्ये चालवले जावेत. आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागण्या आयएमए राष्ट्रीय स्तरावर करत आहे. त्या मागण्यांचा पुनरुच्चार आम्ही सर्व स्तरांमध्ये करत आहोत.