पुणे : जीवनावश्यक व इतर आवश्यक औषधांना वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केली आहे. सरकारने या औषधांना जीएसटीतून वगळल्यास नागरिकांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च कमी होईल, असा दावा असोसिएशनने केला आहे.
सरकारने कर्करोगाशी निगडित औषधे आणि इतर काही आवश्यक औषधांवरील जीएसटी दरात कपात केली होती. त्यानंतर आता जीवनावश्यक आणि इतर आवश्यक औषधांना जीएसटीतून वगळण्याची मागणी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली व मानद सरचिटणीस डॉ. शर्वरी दत्ता यांनी केली आहे. आयएमएचे देशभरात चार लाखांहून अधिक सदस्य आहेत.
संघटनेने म्हटले आहे की, सरकारने जीवनावश्यक आणि इतर आवश्यक औषधे जीएसटीतून वगळावीत. कर्करोगावरील केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि इतर उपचारपद्धती, तसेच, मधुमेहावरील औषधे, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारावरील औषधे, मूत्रपिंडविकार, रक्तवाहिन्यांचे विकार, थायरॉईड, दमा, श्वसनविकार आणि गंभीर संसर्गावरील औषधांनाही अशा प्रकारे सवलत देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर रक्तविकाराच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांनाही ही मुभा द्यावी.
वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीचा दर कमी करावा, अशी मागणी आयएमएने केली आहे. संघटनेने म्हटले आहे, की वैद्यकीय उपकरणे ही आरोग्यसेवा क्षेत्राचा कणा असतात. त्यावरील जीएसटी कमी केल्यास रुग्णालयांचा खर्च कमी होणार आहे. त्यातून रुग्णालये परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देऊ शकतील. तसेच, रुग्णशय्यांवर सध्या जीएसटी आकारला जातो. तो काढून टाकण्याची आवश्यकता आहे. जीएसटी नोंदणीच्या प्रक्रियेत डॉक्टरांना अनेक अडचणी येत असून, त्या दूर कराव्यात. आरोग्य विमा हप्त्यावरील जीएसटी काढून टाकावा. कारण त्यामुळे व्यक्ती अथवा कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या
- अत्यावश्यक व इतर आवश्यक औषधे जीएसटीतून वगळावी.
- वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी कमी करावा.
- जीएसटी नोंदणीच्या प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत.
- रुग्णशय्यांवरील जीएसटीची आकारणी बंद करावी.
- आरोग्य विमा हप्त्यांवरील जीएसटी काढून टाकावा.