पुणे : पर्यावरणात होत असलेल्या बदलांमुळे आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीनचार वर्षांत पुण्यात कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दृष्टीने शहरासह जिल्ह्यात आपत्तीच्या परिस्थितीत मनुष्यहानी टाळण्यासाठी सूचनांचा वेगवान प्रसार होणे महत्त्वाचे असून सर्व संबंधित विभागांनी तत्काळ प्रतिसादावर भर द्यावा. शहर आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह विकासकामांची अधिकाऱ्यांनी पाहणी करून आपत्तीची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मोसमी पाऊसपूर्व आढावा बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. ते म्हणाले, ‘पावसाळी पर्यटनस्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता अपघात होणार नाही, यासाठी पूर्व खबरदारीच्या उपाययोजना करा. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. पालखी सोहळय़ाच्या वेळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालखी मार्गावरील उताराच्या ठिकाणी आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.’
धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शहरात कमी वेळात होणाऱ्या मोठय़ा पावसामुळे नदीपात्रात होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आवश्यक सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. त्याकरिता नदीपात्रातील अतिक्रमणे दूर करण्यात यावीत. आपत्तीला प्रतिसाद देण्यापेक्षा आपत्ती आल्यास नुकसान होणार नाही याचे नियोजन आधी करावे. नद्यांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सहकार्य करेल. आपत्तीला प्रतिसादासाठी विविध यंत्रणांना आवश्यक साधने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. मनुष्यबळाचे प्रशिक्षण लवकरच एनडीआरएफमार्फत करण्यात येणार आहे. आपत्तीकाळात उपयोगात आणण्यासाठी देशातील सर्वोत्तम उपकरणे जिल्ह्यात आहेत. आपत्तीच्या काळात परिवहन महामंडळाने रात्रीच्या वेळी धोकादायक भागात बस सुरू ठेवू नये. देशातील सर्वोत्तम एनडीआरएफ टीम पुण्यात आहे, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एम. होसाळीकर यांनी पुण्यातील हवामानाच्या अंदाजाविषयी सादरीकरण केले. देशात यंदा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामानावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांच्या परिणामानुसार हवामान विभागाकडून सातत्याने हवामानाचा अंदाज देऊ असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी, बीएसएनएल आदी विविध विभागांनी या वेळी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विविध उपाययोजना
जिल्हा परिषदेकडून सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व लघु प्रकल्पांचे दरवाजे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सामाजिक दायित्व निधीतून १०० जेसीबी यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९५ प्रकल्पांतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ येथील नाला खोलीकरणाचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साकवांचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.