पिंपरी : दागिने घालू नका, चोऱ्या वाढल्याचे सांगून पोलीस असल्याची बतावणी करून तिघांनी एका महिलेचे एक लाख ४८ हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन बांगड्या पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने काढून घेतल्याचा प्रकार बावधन येथे घडला.

या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डी पॅलेस चौक, बावधन येथून पायी घरी जात असताना, सिद्धार्थ नगर तरुण मंडळ वाचनालयासमोर उभ्या असलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी त्यांना थांबवले. त्यानंतर मागून आलेल्या तिसऱ्या अनोळखी पुरुषाने “मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, तुम्ही मंगळसूत्र घालू नका, आता भरपूर चोऱ्या होत आहेत, बऱ्याच चोरी करणाऱ्या टोळ्या आल्या आहेत” असे सांगितले. त्यांनी फिर्यादीचे एक लाख ४८ हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन बांगड्या पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने काढून घेतले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

चाकणमध्ये मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

चाकण येथे भरधाव वेगात आलेल्या मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, सहप्रवासी महिला गंभीर जखमी झाली. सुशांत सुरेश ओव्हाळ (३२, भोसे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी प्रनेश सुरेश ओव्हाळ (२४,, भोसे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ सुशांत हा दुचाकीवरुन जात होता. चाकण गावच्या हद्दीत दावडमळा चाकण ते आंबेठाण या रस्त्यावरुन जात असताना समोरुन आलेल्या मोटारीने धडक दिली. या अपघातात सुशांतच्या डोक्यास, हाता-पायास, तोंडास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच, पाठीमागे बसलेल्या सह प्रवासी महिलेच्या डोक्यास, कंबरेस, पोटास मार लागला आहे.

निगडीत गुटखा विक्री टपरीचालकास एकास अटक

निगडी पोलीस ठाणाच्या हद्दीतील थरमॅक्स चौकाजवळ प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाला विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी पानटपरी चालकाला अटक केली.

फरदिन फिरोज शेख (२०, शरदनगर, चिखली, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा टपरी चालवतो. त्याने त्याच्या टपरीमध्ये २३ हजार ४८० रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपन्यांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि पानमसाला व सिगारेट पाकिटे स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या खरेदी करून विक्रीसाठी ठेवली. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. गुटख्याचा साठा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत लॉटरी सेंटर मधील जुगार अड्ड्यावर कारवाई

भोसरीतील पीएमटी चौकात इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन ताटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळत होते. या जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये ८० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

आळंदीत बांधकाम प्रकल्पावरुन पडल्याने मजुराचा मृत्यू

आळंदी येथील बांधकाम प्रकल्पावर सुरक्षेची खबरदारी न घेतल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (१५ जुलै) घडली.

चंद्रकांत यशवंत सुतार (५३, वडगाव रोड, आळंदी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. निरहार भिमन्ना मेलकेरी (४३, चऱ्होली बुद्रुक) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल दुधमल यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीत गृहप्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तिसऱ्या मजल्यावर काम चालू असताना देखील इमारतीच्या बाहेरील बाजूने मजुरांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी संरक्षण जाळी ठेकेदाराने लावली नाही. तसेच, मजुरांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून त्यांना हेल्मेट व हार्नेस न दिल्याने आणि निष्काळजीपणा केल्याने दोन्ही कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना खाली रोडवर पडले. यात चंद्रकांत यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.