पुणे : शहरातील तीन दुय्यम निबंधक कार्यालयांतील ‘ई-मोहोर’ प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर इतरही सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांत या प्रकल्पाची आज, सोमवारपासून (१ सप्टेंबर) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये गतिमानता आणण्यासाठी या प्रकल्पांतर्गत कार्यालयांना गुणांकन दिले जाणार आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नागरिकांना दस्तनोंदणीची सेवा दिली जाते. नोंदणी झालेला दस्त विनाविलंब स्कॅन करून संबंधित पक्षकारांना परत देणे, ऑनलाइन पद्धतीने नोंदणीस दाखल होणाऱ्या लीव्ह ॲण्ड लायसन्स करारनाम्याची नोंदणी तातडीने करणे, ऑनलाइन पद्धतीने फायलिंगसाठी दाखल होणाऱ्या नोटीस ऑफ इंटिमेशनचे फायलिंग करणे अशी कामे या कार्यालयाकडून केली जातात. त्याचबरोबर नोंदणी झालेल्या दस्तांचे स्कॅन पीडीएफवर डिजिटल साइन करण्यासाठी ‘ई-मोहोर’ प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याची तीन कार्यालयांत चाचणी घेण्यात आली होती. या कार्यालयांत हा प्रकल्प यशस्वी झाल्याने अन्य २४ कार्यालयांतही हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली. त्याबाबतचे कार्यालयीन आदेश हिंगाणे यांनी प्रसिद्ध केले आहेत.
कार्यालयाने दाखविलेल्या तत्परतेची नोंद व्हावी आणि मूल्यमापन व्हावे, यासाठी कार्यालयांसाठी गुणांकन पद्धत राबविली जाणार आहे. त्यासाठी सेवा तत्परता गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. दुय्यम निबंधकांनी कार्यालयीन वेळेपूर्वी किमान पाच मिनिटे आधी लाॅगिन करणे, दस्तनोंदणी झाल्यावर स्कॅनिंग करणे, ई-रजिस्ट्रेशनची कामे तातडीने करणे, ई-फायलिंग, डिजिटल सायनिंगची कामे या निकषानुसार गुणांकन दिले जाणार आहे. जे कर्मचारी एक किंवा दोन दिवसांपासून एखाद्या कार्यालयात अतिरिक्त कार्यभार स्वीकारतील, त्यांच्यासाठी त्या महिन्यातील त्यांच्या कार्यभाराचे स्वतंत्र गुणांकन करण्यात येणार आहे. या गुणांकन पद्धतीमधील कामगिरीची नोंद गोपनीय अहवालात करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.