पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेली पार्किंग नियमावली अखेर राज्य शासनाकडून मंजूर झाली असून मंजुरीनंतर या नियमावलीची अंमलबजावणी मंगळवारपासून पुण्यात सुरू झाली आहे. पार्किंगसाठी बांधण्यात आलेल्या मजल्यांची उंची इमारतीच्या उंचीत न मोजण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ही नियमावली मंजूर करताना घेण्यात आला आहे.
शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पार्किंगचे प्रचलित नियम बदलून नवी नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव सन २००९ पासून चर्चेत होता. त्यानंतर नियमावली तयार होऊन तिला मुख्य सभेची मंजुरी मिळाली. अंतिम मंजुरीसाठी ही नियमावली गेली दोन वर्षे शासनाकडे होती. ती मंजूर झाल्यामुळे या नव्या नियमावलीची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे.
मोठय़ा बांधकामांमध्ये फक्त पार्किंगसाठी मजला बांधल्यास त्या मजल्याची उंची इमारतीच्या उंचीत मोजली जात असे. ही उंची इमारतीच्या उंचीतून वगळली, तर विकसकाला लाभ होईल आणि पार्किंगसाठी देखील जादा जागा मिळेल, या दृष्टीने ही उंची इमारतीच्या उंचीत मोजू नये, असा प्रस्ताव होता. तो शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार पार्किंगसाठीच्या मजल्याची उंची इमारतीच्या उंचीत मोजली जाणार नाही.
पार्किंगसाठी किती जागा सोडावी लागेल यासंबंधीचे नवे नियम पुढीलप्रमाणे आहेत.
पंधराशे चौरसफूट क्षेत्र वा त्यापुढील सदनिका – तीन कार, दोन स्कूटर, दोन सायकली, आठशे ते पंधराशे चौरसफुटांपर्यंतच्या सदनिका – दोन कार, दोन स्कूटर, दोन सायकली, चारशे ते आठशे चौरसफुटांपर्यंतच्या सदनिका एक कार, दोन स्कूटर, दोन सायकली चारशे चौरसफुटांच्या आतील सदनिका- एक कार, चार स्कूटर, चार सायकली.
लॉिजग, टुरिस्ट होम – प्रत्येक पाच खोल्यांसाठी- तीन कार, चार स्कूटर, चार सायकली. या प्रमाणात. चार व पंचतारांकित हॉटेल्स- प्रत्येक पाच खोल्यांसाठी तीन कार, सहा स्कूटर, चार सायकली. रेस्टॉरंटस्- प्रत्येकी पाचशे चौरसफूट क्षेत्रफळासाठी (विरळ लोकवस्तीचा भाग)- दोन कार, आठ स्कूटर, चार सायकली, दाट लोकवस्तीच्या भागात- कारसाठी जागा नाही, आठ स्कूटर, आठ सायकली.
रुग्णालये- प्रत्येकी १० खाटांसाठी- तीन कार, बारा स्कूटर, दहा सायकली.
प्रेक्षागृह, एकपडदा चित्रपटगृह, प्रत्येकी चाळीस खुच्र्यासाठी- चार कार, बारा स्कूटर, आठ सायकली. बहुपडदा चित्रपटगृह – प्रत्येकी चाळीस खुच्र्यासाठी- सहा कार, सोळा स्कूटर, चार सायकली.
मंगल कार्यालये व सभागृह- प्रत्येकी एक हजार चौरसफुटांपर्यंत- पाच कार, वीस स्कूटर, आठ सायकली.
शाळा- (प्रशासनासाठी) प्रत्येकी एक हजार चौरसफुटांपर्यंत- एक कार, दोन स्कूटर, आठ सायकली. शाळेतील प्रत्येकी तीन वर्गखोल्यांसाठी – दोन शालेय वाहतुकीची वाहने, दहा स्कूटर, साठ सायकली. महाविद्यालये – (प्रशासनासाठी) दोन कार, वीस स्कूटर, दहा सायकली. महाविद्यालयातील प्रत्येक तीन वर्गासाठी – दोन कार, नव्वद स्कूटर, तीस सायकली.
उशिरा का होईना, चांगला निर्णय
शहरातील पार्किंगचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन ही नियमावली तयार करण्यात आली होती आणि गेली दोन वर्षे ती राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत होती. उशिरा का होईना; पण शहरासाठी चांगला निर्णय झाला आहे, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांनी या निर्णयावर व्यक्त केली. निकम यांनी या नियमावलीचा आग्रह धरून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. ही नियमावली यापूर्वीच मंजूर झाली असती, तर शहरात पार्किंगसाठी गेल्या दोन वर्षांत अधिक जागा निर्माण झाल्या असत्या, असेही ते म्हणाले.