दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : युरोपीय संघातील देशांनी २०२१ मध्ये सुमारे ४०७० टन बेडकांचे पाय फस्त केले. त्यासाठी इंडोनेशिया, तुर्कस्तान, अल्बानियातून बेडकांची मोठय़ा प्रमाणावर आयात करण्यात आली होती. परिणामी, संबंधित देशांतील अन्न साखळी आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. भारताने मात्र १९८७ पासून बेडकांची निर्यात बंद केली आहे.

जर्मनीच्या ‘प्रो वाइल्ड लाइफ’ आणि ‘फ्रान्सच्या रॉबिन डेस बोइस’ या दोन पर्यावरणवादी संस्थांच्या मदतीने ‘डेडली डिश’ या नावाने हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांनी स्थानिक बेडकांच्या जातींना संरक्षित करून त्यांना पकडणे आणि मारण्यावर बंदी घातली आहे. मात्र, जगभरातून ज्या-ज्या ठिकाणांहून शक्य आहे त्या-त्या ठिकाणांहून बेडकांची बेसुमार आयात सुरूच आहे. ज्या देशांतून बेडकांची आयात केली जात आहे, तेथेही बेडकांच्या जाती सुरक्षित नाहीत. २०११ ते २०२० या काळात युरोपीय देशांनी ४०.७०० टन बेडकांचे पाय आयात केले होते, त्यासाठी २०० कोटी बेडकांची शिकार केली होती. युरोपात दरवर्षी सरासरी ४०७० टन बेडकांच्या पायांची आयात होते, त्यासाठी सुमारे २० कोटी जंगली बेडकांची शिकार करण्यात येते.

इंडोनेशियातून सर्वाधिक निर्यात

अमेरिकेतही बेडकांच्या पायाला मोठी मागणी असते, त्यासाठी बेडकांची शेती केली जाते. आयातीवरही नियंत्रण आहे. मात्र, युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये आयातीवर कोणतेही नियंत्रण नाही. युरोपीय देशांत सर्वाधिक ७४ टक्के जंगली बेडकांची आयात इंडोनेशियातून होते. त्याखालोखाल ४ टक्के तुर्कस्तान आणि ०.७ टक्के अल्बानियातून होते. बेसुमार आयातीमुळे या देशांमधील जंगली बेडकांच्या जाती संकटात आल्या आहेत. खेकडे खाणाऱ्या मोठय़ा पायांच्या पूर्व आशियातील जंगली बेडकांना संपूर्ण युरोपात मोठी मागणी असते. २०१० ते २०१९ या काळात इंडोनेशियातून युरोपला ३० हजार टन बेडकांच्या पायांची निर्यात झाली. पर्यावरण अभ्यासकांनी तुर्कस्तानमधून २०३२ पर्यंत बेडकांच्या प्रजातीच नष्ट होण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, बेडकांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. तणनाशक आणि रासायनिक खतांचा बेडकांवर विपरीत परिणाम होत आहे, अशी खंत पीक संरक्षक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी व्यक्त केली.

भारताची बंदी 

१९८० मध्ये बेडकांचे पाय निर्यात करणारा भारत सर्वात मोठा देश होता. १९८४ मध्ये बेडकांच्या चार हजार टन पायांची निर्यात झाली होती. १९८५ मध्ये ती अडीच हजार टनांवर आली होती. १९७० पासूनच पर्यावरणवादी निर्यातीविरोधात जागृती करीत होते. बेडकांची संख्या वेगाने घटल्याचा परिणाम शेती, अन्न साखळीसह संपूर्ण पर्यावरणावर होऊ लागल्यामुळे १९८७ मध्ये भारताने बंदी घातली. 

डेडली डिशअहवालात काय?

’२०११ ते २०२० दरम्यान युरोपीय देशांकडून ४०.७०० टन बेडकांचे पाय आयात, त्यासाठी २०० कोटी बेडकांची शिकार.  

’युरोपात दरवर्षी ४०७० टन बेडकांच्या पायांची आयात, त्यासाठी सुमारे २० कोटी जंगली बेडकांची कत्तल.

’इंडोनेशिया, तुर्कस्तान आणि अल्बानियातील जंगली बेडकांच्या जाती संकटात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेडूक शेतीसाठी आणि पर्यायाने अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचा घटक आहे. लष्करी अळी, खोडकिडा, हिरवी अळी यांसह अन्य अळय़ांना बेडूक पतंग आणि अंडय़ाच्या अवस्थेतच खातो. तो त्याच्या वजनाइतके म्हणजे सरासरी तीन हजार कीटक एका आठवडय़ात खातो. – उत्तम सहाणे, पीक संरक्षक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू