पुणे: वन्यजीव शिकार प्रकरणी वन विभागाने मौजे हडसर (ता. जुन्नर) येथे छापा टाकून २१ जणांना ताब्यात घेतले आहे. मौजे हडसर येथील वन क्षेत्रात अज्ञात व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती १३ मे रोजी राजूर येथील वनरक्षक एकनाथ धोंडू बांगर यांना मिळाली. जुन्नरच्या पथकाने त्या ठिकाणी छापे टाकून मौजे सुराळे येथील १५ जण, मौजे हडसर येथील ४ जण, तसेच मौजे तेजूर आणि मांगणेवाडी (खामगाव) येथील प्रत्येकी १ जण अशा एकूण २१ जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या भागात २० ते २५ जण राखीव वनात फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक निमगिरी आणि वनरक्षक आपटाळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शिकाऱ्यांनी राखीव वनक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वाघुरी लावले असल्याचे तसेच वाघुरीच्या दिशेने वन्य प्राण्यांना हुसकावत असल्याचे दिसून आले. जुन्नर येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना त्याबाबत कळवले. चव्हाण यांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ पाठवले. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी त्यांनी आणलेल्या एकूण २१ वाघुरी, त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या १० दुचाकी घटनास्थळी जप्त करण्यात आले.या सर्व २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.
मौजे सुराळे येथील आरोपी नीलेश केदारी, रमेश केदारी, प्रदीप केदारी आणि मौजे हडसर येथील किसन भले हे तपास कामामध्ये सहकार्य करत नसल्याने तसेच तपासकामी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना अटक करून बुधवारी जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
वन विभागाच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील अन्य १७ आरोपींनी गुन्ह्याबाबतची कबुली दिली असून, त्यांना बंधपत्रावर मुक्त करण्यात आले आहे.ही कारवाई जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि अमृत शिंदे, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, तसेच जुन्नर वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.