पुणे : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिरुर तालुक्यातील केंदूर गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी विनायक सदाशिव थिटे (रा. थिटे आळी, केंदूर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्यासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोटारीच्या धडकेत राजेंद्र नाथू थिटे (मूळ रा. केंदूर, ता. शिरुर, जि. पुणे) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेंद्र नोकरीनिमित्त नगर रस्त्यावरील शिक्रापूर येथे राहायला आहेत. त्यांचे मूळ गाव केंदूर असून, तेथे त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या परिसरातील जुने घर पाडून सात ते आठ महिन्यांपूर्वी राजेंद्र यांनी बांधकाम सुरू केले. जुन्या घरातील वीजेचे मीटर काढून राजेंद्र यांनी वाटणीत आलेल्या शेतजमिनीतील जांभळाच्या झाडाला लावले. त्यानंतर राजेंद्र यांचा चुलतभाऊ विनायकने जांभळाच्या झाडाजवळ लावलेल्या मीटरजवळ पत्रा लावला.

हेही वाचा…पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेंद्र, त्यांची पत्नी अनिता, मुलगा आकाश आणि मुलगी प्रतिभा शुक्रवारी (१ नोव्हेंबर) केंदूर गावातील घरी गेले. मीटरजवळ पत्रा लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मीटर काढून दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चुलतभाऊ विनायक, त्यांचे पत्नी वृषाली, गणेश, त्याची पत्नी सारिका, अमित, काका सदाशिव तेथे आले. त्यांनी राजेंद्र यांना शिवीगाळ केली. ही जमीन आमच्या मालकीची आहे. पत्रा का हलविला, अशी विचारणा करुन त्यांना मारहाण सुरू केली. राजेंद्र यांची मुलगी प्रतिभा हिने मारहाणीचे चित्रीकरण मोबाइल कॅमेऱ्याद्वारे केले. आरोपींनी मुलीला धक्का दिला, तसेच तिचा मोबाइल संच हिसकावून घेतला. त्यानंतर राजेंद्र, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी तेथून निघाले. रस्त्याने विनायक निघाले. त्यांच्या पाठाेपाठ आरोपी विनायक मोटारीतून आला. त्याने रस्त्याने निघालेल्या राजेंद्र यांना पाठीमागून मोटारीची धडक दिली. त्यांना चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधना राखून राजेंद्र मोटारीच्या बोनेटवर चढले. त्यांना फरफटत नेण्यात आले, असे राजेंद्र थिटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.