पुणे: वाहन वळविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका पर्यटकाचा खून करण्यात आल्याची घटना लोणावळ्यात घडली. मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (२५ मे) रात्री लोणावळ्याजवळील कार्ला फाट्याजवळील दहिवली गावातील एका फार्महाऊसजवळ घडली.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडूर कोंडकरूल, गुहागर, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्याचे आहे. मनोज मधुकर वरवटकर (वय ४२) व प्रज्वल उदय मेहता (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही रत्नागिरी जिल्ह्यातील असून, ते पर्यटनासाठी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी कार्ला फाटा परिसरातील दहिवली गावाजवळ वाहन वळविण्याच्या कारणावरून पर्यटक आणि स्थानिक तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. स्थानिकांनी लोखंडी गज, दांडके, वायपरनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचाादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोघे पर्यटक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मनोज वरवटकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. कर्जत, रायगड), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (दोघे रा. वेहेरगाव, मावळ), गौरव संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे तपास करत आहेत.