पिंपरी : चाकण येथे दोन तर पिंपरी येथे एक कारवाई करीत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने १७ किलो ३७२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या तीन कारवायांमध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. नोहिद अहमदसाब पठाण (२४, चाकण), सलमान हसन सय्यद (२९, मंचर), सनी विजय शहा (२१, नारायणगाव), सनी धर्मासिंग माचरेकर (१९, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पहिली कारवाई चाकण मधील नाणेकरवाडी येथे गुन्हे शाखा युनिट तीनने केली. नोहिद पठाण याच्याकडून पोलिसांनी १७ हजार ३४८ रुपये किमतीचा ३४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सागर जैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकी बुद्रुक येथे केली. सलमान सय्यद आणि सनी शहा हे दोघेजण वाकी गावात गांजा विक्रीसाठी दुचाकीवरून आले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख ६५ हजार ८०० रुपये किमतीचा ११ किलो ८१० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल फोन, दुचाकी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. विशाल मोहिते नावाच्या व्यक्तीने हा गांजा सलमान आणि सनी यांना विक्रीसाठी आणून दिला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिसरी कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी मधील रिव्हर रोड येथे केली. सानी माचरेकर यांच्याकडून पाच किलो २१४ ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण तीन लाख ७०० रुपयांचा ऐवज त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कर्पे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.