पिंपरी- चिंचवड: औद्योगिक नगरी आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवडमध्ये गुन्हेगारी काही प्रमाणात डोके वर काढत आहे. पाच महिन्यांपूर्वी भोसरीमध्ये रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली. आश्चर्यकारक म्हणजे पोलिस नव्हे तर आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी तपास करून आणि माहिती काढून सीसीटीव्हीच्या आधारे खऱ्या आरोपींचा शोध घेतला. आपल्या मुलीला न्याय दिला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ कठोर पाऊल उचलत आरोपी क्षितिज लक्ष्मण पराड (वय २० वर्ष)आणि तेजस पांडुरंग पठारे (वय १९ वर्ष) या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन बारा वर्षीय मुलीने ६ जून २०२४ रोजी राहत्या घरात रात्री साडेसातच्या सुमारास बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अवघे कुटुंब दुःखात लोटले गेले. फिर्यादी हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची चहाची टपरी आहे. यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. परंतु, पोटचा गोळा असलेल्या मुलीने आत्महत्या का केली? असा प्रश्न सतत वडिलांना पडत असल्याने त्यांनी नैराश्यात न जाता स्वतः तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही तपासले, परिसरात चौकशीही केली. याच दरम्यान, बारा वर्षीय मुलीच्या खिशात आरोपीच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी मिळाली. यामुळे आरोपी हे मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप पालकांनी करत भोसरी पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर २०२४ रोजी फिर्याद दिली. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ गुन्हा दाखल करून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोघांना अटक केली आहे. ज्यावेळी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली तेव्हापासून भोसरी पोलिसांनी काहीच तपास केला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. वडिलांना तत्परतेने चौकशी करून आणि सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास का करावा लागला? अशी वेळ पालकांवर पोलिसांनी का आणली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : पिंपरी : महापालिकेची ‘पीपीपी’ तत्त्वातून फुगेवाडीत पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा

महाराष्ट्रात महिला, तरुणी सुरक्षित आहेत का? असा वारंवार प्रश्न विरोधक विचारत आहेत. अशातच पुण्यात गुरुवारी २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. भोसरीमध्ये देखील रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून अवघ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीने आपले जीवन संपवल्याचे समोर आल़े. या दोन्ही घटना मनाला चटका लावणाऱ्या आहेत. पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. औद्योगिक नगरी आणि स्मार्ट सिटी असणाऱ्या पिंपरी- चिंचवड मध्ये पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे. केवळ जुजबी कारवाई न करता पोलिसांनी कठोर पाऊलं उचलावीत असा रोष पालक व्यक्त करत आहेत. महाविद्यालये, शाळांभोवती फिरणाऱ्या रोड रोमिओंवर कडक कारवाई व्हायला हवी. प्रत्यक्षात मात्र पोलीस अशी कारवाई करताना दिसत नाहीत. रोड रोमिओंवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. ते मुलींचा पाठलाग करून त्रास देतात. अशा घटनांवर आळा आणायचा असेल तर पोलिसांना प्रत्यक्षात कारवाई करावी लागणार आहे.

हेही वाचा : भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचा इशारा; विधानसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आई- वडिलांना संशय आल्याने त्यांनी ही तक्रार दिली आहे. मुलीला ते त्रास देत होते असा आरोप पालकांचा आहे. मुलीकडे आरोपीच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी मिळाली. आम्ही कठोर पाऊलं उचलत दोघांना अटक केली. तपास सुरू आहे.

विश्वनाथ चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)