पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात चिमुकल्यांनी करोनावर मात केली आहे. तर दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात बालरोग विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाला यश आले. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना पिंपरी-चिंचवड शहरातील २ ते १२ वर्षे वयोगटातील ७ मुलांनी कोरोनावर मात केली. आज यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून या मुलांना सुखरूप घरी सोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ आणि १७ एप्रिल रोजी ही ७ कोरोनाग्रस्त मुले बालरोग विभागात दाखल झाली होती. त्यामध्ये रूपीनगर निगडी मधील ५ मुलांचा तर भोसरीतील २ समावेश होता. या मुलांवर वेळोवेळी सर्व उपचार देवून १४ दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले होते. यापैकी दोन मुलांवर करोनाचे उपचार चालू असतांना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण ३०,००० व ६६,००० असे प्रयोगशाळेतील अहवालानुसार झाले होते. सशक्त मुलांमध्ये हे प्रमाण १,५०,००० च्या वर असते. त्यासाठी या मुलांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले. त्यांना बालरोग अतिदक्षता विभागात त्यांच्या आईसोबत ठेवण्यात आले होते.

आई आणि मुलांच्या १४ दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आज त्यांना घरी सोडण्यात आले. बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने ही कामगीरी करता आली.

बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना पुनर्जन्म मिळाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad 7 kids defeated corona virus infection aau 85 kjp
First published on: 02-05-2020 at 18:53 IST