पिंपरी : वाहनांचा धूर, बांधकामे, फटाक्यांमुळे शहरातील हवा अतिवाईट श्रेणीत गेली आहे. भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, शहरातील सर्व बांधकामे आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडत आहे. त्यामुळे शहरातील हवा अतिवाईट श्रेणीत गेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३२ प्रभागांमध्ये १६ वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा : कौतुस्कास्पद! पिंपरी आयुक्तांनी साडेचार हजार पोलिसांना दिवाळीनिमित्त दिली ‘ही’ भेट

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रदूषणाच्या नोंद घेतल्या आहेत. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम १०) वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीपर्यंत पोहोचली होती. सफर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याने पर्यावरण विभागाने शहरातील सर्व बांधकामे आठ दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली असून १९ नोव्हेंबर पर्यंत सर्व बांधकामे बंद राहणार आहेत.

हेही वाचा : “काळजी न घेतल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो निर्माण”, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांचा इशारा

आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात

शहरातील हवेची गुणवत्ता ढासळून खराब श्रेणीत आल्याने प्रदूषणाची समस्या वाढली आहे. थंडीच्या काळात हवेचा वेग ही मंदावतो, परिणामी जमिनीलगतचे तापमान कमी असल्याने हवेतील प्रदूषणाचे धूलिकणदेखील जमिनीलगतच्या थरात राहतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत हवेची गुणवत्ता खराब होते. हिवाळ्यात आधीच सर्दी खोकल्याचे आजार उद्भवतात, त्यात आता हवेची गुणवत्ता ढासळल्याने आरोग्याच्या समस्या देखील वाढू शकतात.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड : कुरघोड्या, राजकीय डाव करणारे नेते एकाच मंचावर, नेत्यांमध्ये रंगल्या गप्पागोष्टी

“फटाक्यांसह आदी बाबींमुळे शहरातील काही भागाची हवेची पातळी खालावली आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची ‘रोड वॉशर’ यंत्रणा असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.” – संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad air pollution at danger level constructions in the city stopped for 8 days ggy 03 css
First published on: 14-11-2023 at 10:45 IST