पिंपरी : वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या मित्रांनी एका मित्रावर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. सुशील ढवळे (४०, पिंपळे सौदागर) असे जखमी व्यक्तीने नाव आहे. सुशील यांच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रितम चंद्रकांत कारंडे (५४, पिंपळे गुरव), सोमेश्वर संभाजी कांबळे (३३, आळंदी), नंदु सुदाम गायकवाड (४८, म्हाळुंगे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील आणि आरोपी हे मित्र आहेत. ते सोमेश्वर याच्या वाढदिवसासाठी सोमवारी पिंपळे सौदागर येथे जमले होते. वाढदिवस साजरा करण्याच्या करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी सुशील यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच चाकूने त्यांच्या छातीवर, डाव्या दंडावर आणि डाव्या पायावर वार करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

मोशीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा

व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूपाचा कचरा प्रक्रियेविना सार्वजनिक ठिकाणी टाकल्याप्रकरणी सहा वाहन चालक आणि मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उप अभियंता योगेश सोपान आल्हाट (४२) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाबद्दल जनजागृती केली जाते. उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन केले जाते. असे असतानाही आरोपींनी घरगुती, औद्योगिक आणि घातक स्वरूपाचा कचरा प्रक्रियेविना मोशी येथील ९० मीटर रस्त्याच्या कडेला व परिसरात अस्ताव्यस्त टाकलेला आढळला. हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास जीवघेण्या आजारांचा संसर्ग पसरू शकतो हे माहित असतानाही त्यांनी हे कृत्य केले. यामुळे जलप्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण तसेच रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंध कायदा, पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करत आहेत.

तडीपार गुंडाला अटक

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई कासारवाडी येथे करण्यात आली. शकिल करीम शेख (२८, नांगरे चाळ, कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन बरकडे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी शकील याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून शकील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

रिक्षा चालकाला लुटले

रिक्षाचालकाला थांबवून पैशाची मागणी करत, पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लुटल्याची घटना कासारवाडी येथे घडली. या प्रकरणी रिक्षा चालकाने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षा चालक आहेत. ते रविवारी रात्री भाडे सोडून घरी जात असताना कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस, लांडगे मळा येथे आरोपींनी त्यांना थांबवले आणि पैशाची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात दगड मारला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींची कुंडलिक यांच्या खिशातून ८३० रुपये रोख रक्कम आणि १० हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. दापोडी पोलीस तपास करत आहेत.