पिंपरी : आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट या संघाच्या क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणाऱ्या पाच जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई हिंजवडी येथे करण्यात आली.

अंकुश यशवंत कुशवाह (२५), विक्रम ललित झा (२५), आयुष कुमार झा (२६), गौरव शिवराम ठेंगरी (२६, रा. हिंजवडी), प्रेमकुमार ईश्वरदास राजवानी (५२, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश मेदगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना मंगळवारी झाला. या सामन्यावर हिंजवडी येथील एका गृहनिर्माण सोसायटीत ऑनलाइन माध्यमातून सट्टा घेतला जात होता. याबाबत माहिती मिळाली असता, क्रिकेट सामना सुरू असतानाच पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. कारवाईमध्ये चार लॅपटॉप, १८ मोबाइल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींकडे दुसऱ्यांच्या नावावर नोंद असलेले सिमकार्ड आढळून आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.