पिंपरी : पाण्याच्या टाकीत बुडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवड, मोहननगर येथे घडली. महिलेच्या मुलाचा चार नोव्हेंबर रोजी विवाह होता. घरात लगीनघाई, पाहुण्यांची ये-जा, खरेदीची लगबग सुरू होती. आनंदात न्हाऊन निघालेल्या घरावर अचानक काळाने घाला घातला.
आशा संजय गवळी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आशा या गृहिणी तर त्यांचे पती पुण्यातील शाळेत कर्मचारी आहेत. आशा यांच्या मुलाचे लग्न येत्या चार नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार होते. घरात लग्नाचे धार्मिक विधी सुरू होते. सगळी मंडळी तयारीत गुंतलेली. शुक्रवारी घरात ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवण्यात आले होते. स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच पाण्याची टंचाई जाणवली. त्यामुळे आशा या गृहनिर्माण सोसायटीच्या वाहनतळामधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली, मात्र पाणी खोल असल्याने बादलीत पाणी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या टाकीत पडल्या.
आई दिसत नसल्याने मुलगा शोध घेऊ लागला. टाकीचे झाकण उघडे दिसले. त्याने आत पाहिले असता आई पाण्यात बुडालेली दिसली. आशा यांना बाहेर काढले. त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत वायसीएम रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी आशा यांना मृत घोषित केले.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, आशा यांच्या मुलाचे लग्न येत्या चार नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार होते. घरात लग्नाचे धार्मिक विधी सुरू होते. सगळी मंडळी तयारीत गुंतलेली. शुक्रवारी घरात ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहनतळामधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यात तोल जाऊन खाली पडल्या.
घरात लगीनघाई, पाहुण्यांची ये-जा, खरेदीची लगबग सुरू होती. आनंदात न्हाऊन निघालेल्या घरावर अचानक काळाने घाला घातला.
