पिंपरी : थंड पेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून दुकानमालक तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करताना तरुणाने प्रतिकार केल्याने चोरट्याने त्याच्यावर गोळीबार केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी कॅम्पातील साई चौकाजवळ घडली.जखमी तरुणाला पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्पात साई चौकाजवळ किराणा दुकान आहे. तरुण शुक्रवारी दुकानाबाहेर बसला होता. आरोपी दुपारी दीडच्या सुमारास थंड पेय घेण्याच्या बहाण्याने तेथे आला. तरुण त्याला थंड पेय देत असतानाच चोरट्याने तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणाने विरोध केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळी तुटली. अर्धी तुटलेली सोनसाखळी घेऊन चोरटा पळू लागला.
मात्र, तरुणाने त्याचा पाठलाग सुरू केल्याने चोरट्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी तरुणाला लागली. चोरटा पुढे जाऊन दुचाकीवरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्याच्या मागावर दहा ते बारा पथके पाठविण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.
आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत. -डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा